सोमवारी बाजारात ३६० पेट्या दाखल
नवी मुंबई : वाशीच्या एपीएमसी बाजारात हंगाम पूर्व हापूस आंब्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली असून सोमवारी कोकणातून ३६० पेट्या दाखल झाल्या आहेत. जानेवारी महिन्यात बाजारात येणारी आजवरची ही विक्रमी आवक आहे. या आंब्याच्या पेटीमागे ७ ते १२ हजार दर मिळत आहे, अशी माहिती फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी दिली.
कोकणात डिसेंबर महिन्यात हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणात मोहोर येतो. मार्च महिन्यात आंबे काढणीला येतात. त्यामुळे मार्च ते मे असा दोन महिने हापूसचा मुख्य हंगाम असतो आणि या दरम्यान लाखो पेट्या बाजारात दाखल होतात. जानेवारी महिन्यात तुरळक हंगाम पूर्व ३० ते ४० हापूस पेट्या बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. मात्र सोमवारी बाजारात तब्बल ३६० पेट्या कोकणातून दाखल झाल्या आहेत. कोकणातून जानेवारी महिन्यात हंगाम पूर्व दाखल होणारी आवक ही आजवरची विक्रमी आवक आहे. चार डझन पेटीला सात ते १२ हजार रुपयांचा दर मिळत आहे, अशी माहिती फळ व्यापारी व संचालक संजय पानसरे यांनी दिली आहे.
थ्रीप्स रोगाच्या प्रादुर्भावामुळे एप्रिलमध्ये आवक घटणार?
एप्रिलमध्ये काढणीला येणाऱ्या आंब्याला डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात चांगला मोहोर फुटलेला असतो. मात्र जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोकणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कोकणात सध्या आंब्यावर थ्रीप्स रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. त्यामुळे यंदा आंब्याच्या उत्पादनात घट होऊन बाजारात मुख्य हंगामातील हापूसची आवक घटणार आहे, अशी माहिती फळ व्यापारी आणि संचालक संजय पानसरे यांनी दिली.