ठाणेकरांच्या समस्यांचा आयुक्तांपुढे वाचला पाढा

ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने घेतली पालिका आयुक्तांची भेट

ठाणे: कचरा, पाणी, गरीब महिलांना व दिव्यांग बांधवांना योजनेचा न मिळालेला लाभ, सीसीटिव्ही कॅमेरे, अनधिकृत बांधकामे, क्लस्टर योजना, रेंटलची घरे, स्मशानभूमी तसेच वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांनी ठाणेकरांना ग्रासले आहे. यातून त्यांना बाहेर काढा, अशी मागणी करत ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेतली.

यावेळी माजी खासदार राजन विचारे, संपर्कप्रमुख नरेश मणेरा, जिल्हाप्रमुख केदार दिघे व इतर शिवसेना पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयुक्त सौरभ राव यांना यावेळी छायाचित्रांसह पुरावे देण्यात आले आहेत.

घोडबंदरवासींना वाहतूक कोंडीचा फटका दररोज सोसावा लागतो. सेवा रस्ता महामार्गात समाविष्ट करण्याचे नियोजन होत आहे. त्यामुळे महामार्गावर असणाऱ्या अनेक सोसायट्या, शाळा-कॉलेज, हॉस्पिटल यांना मोठा अडथळा होणार आहे. त्यामुळे सेवा रस्ता समाविष्ट करू नये, अन्यथा आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा शिष्टमंडळाने दिला. यावर आयुक्तांनी आठ दिवसांत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असे आश्वासन दिले.

सौंदर्यीकरण केलेल्या उड्डाणपुलाखाली पोलीस भरतीसाठी येणारे तरुण-तरुणी व्यायाम व कवायत करण्यासाठी येत असतात. परंतु ठेकेदारांनी त्या उड्डाणपुलाखाली त्यांचे साहित्य आणि केबिन उभ्या केल्या आहेत. त्यामुळे या जागा बकाल झाल्या आहेत. डायघर, मित्तल कंपाऊंड, कासारवडवली, सीपी तलाव येथे कचरा साठविला जातो. त्यामुळे त्या परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शासनाने ठाणे महानगरपालिकेला पडघा येथे ८५ एकर जागा भाड्याने दिली होती. त्या जागेवर कचरा अद्याप का साठविला जात नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

याचबरोबर पाणीटंचाई, पाण्याच्या टाक्या आदीबाबत आयुक्तांना जाब विचारण्यात आला. स्व. आनंद दिघे यांचे स्मारक उपवन येथे महापौर निवास येथे उभारण्यात येणार होते. यासाठी पाच कोटींची तरतूदही अर्थसंकल्पात केली होती, त्याचे काय झाले? असा प्रश्नही आयुक्तांना विचारण्यात आला.

भाईंदर पाडा येथे सर्वधर्मीय स्मशानभूमीचे काम पाच वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आले होते. परंतु अद्याप या जागेवर कोणतीही काम सुरू झालेले नाही. ठाण्यातील घोडबंदर पट्ट्यात बाळकुम, कापूरबावडी, वागळे इस्टेट, सावरकर नगर, या परिसरात सध्या अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात सुरू आहे. धर्मवीर नगर येथे तर वृक्षतोड करून महापालिकेच्या जागेवर सर्रासपणे २१ गाळे बांधले आहेत. यासंदर्भात धर्मवीर नगर जनहित सेवा समितीने तक्रार सुद्धा केली होती. परंतु अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. दिव्यांग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला यांच्या योजना, रेंटल घरे आदी समस्यांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.