ठाणे: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी गुरुवारी ठाण्याच्या टेंभी नाका येथील स्व. आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या नवरात्रौत्सवात दुर्गेश्वरीचे दर्शन घेतले. यावेळी देवीची खणा-नारळाने ओटी भरून रश्मी ठाकरे यांनी अंबेमातेची महाआरती केली. राज्यातील जनतेला सुख, समृद्धी, स्थैर्य आणि आनंद लाभू दे, असे साकडे त्यांनी देवीला घातले.
रश्मी ठाकरे यांच्या स्वागतासाठी टेंभी नाक्यावर शिवसेना महिला आघाडीच्या रणरागिणींनी तुफान गर्दी केली होती. तसेच यावेळी ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर रहे’, ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब अमर रहे’ या घोषणांनी टेंभी नाका परिसर दणाणून गेला.
दरवर्षी ठाकरे कुटुंबीय देवीचे दर्शन घेऊन महाआरती करतात. रश्मी ठाकरे यांच्या स्वागतासाठी ठाण्याच्या वेशीपासून शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. तसेच त्यांनी शिवसेना उपनेते स्व. अनंत तरे यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या देवीचे दर्शन घेतले. दरम्यान चंदनवाडी शिवसेना शाखा, श्रीरंग शिवसेना शाखा आणि रामचंद्र नगर नवरात्र उत्सवाला त्यांनी भेटी दिल्या. याप्रसंगी शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे, संपर्कप्रमुख नरेश मणेरा जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, एम.के. मढवी, संजय तरे, उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे, शहर प्रमुख अनिश गाढवे, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, संपर्कप्रमुख रंजना नेवाळकर, जिल्हा संघटक रेखा खोपकर, रंजना शिंत्रे, नीलम धवन, वैशाली दरेकर, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, महेश्वरी तरे, नीलिमा शिंदे, ज्योती पाटील आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.