मद्यपी आणि बेशिस्त वाहनचालकांचा उतरला ‘रंग’

* १६८१ जणांवर वाहतूक पोलिसांची कारवाई
* १९६ मद्यपी चालक तावडीत

ठाणे: ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील पाच परिमंडळात होळी आणि धूलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर वाहतूक शाखेने वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या १६८१ जणांवर कारवाई केली.

पोलिसांच्या नाकाबंदीत १९६ मद्यपी चालक तावडीत सापडले. यासह विनाहेल्मेट ८३६, फ्रंट सीट २२७, विरुद्ध दिशेने येणारे १४ आणि ४०८ ट्रीपल सीट दुचाकीस्वारांवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार होळी व धुळवडीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाहतूक विभागातील ४५० पोलिस अधिकारी आणि कर्मचारी नाकाबंदीसाठी तैनात केले होते. होळी-धूलिवंदन कालावधीत मद्यप्राशन करून किंवा नशा करून वाहन चालविणार्‍या चालकांवर कारवाई करण्याची व्यूहरचना वाहतूक विभागाने केली होती. पाच परिमंडळात ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली होती. या नाकाबंदीत नशापान किंवा मद्यप्राशन करून दुचाकी, चारचाकी वाहने चालविणाऱ्या तब्बल १९६ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. तर ८३६ विनाहेल्मेट दुचाकी चालवणारे, ४०८ ट्रीपल सीट दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ऑटो रिक्षामध्ये फ्रंट सीट घेणाऱ्या २२७ चालकांवर कारवाई केली असून विरुद्ध दिशेने वाहने दामटविणारे १४ वाहनचालक तावडीत सापडले आहेत. अशा एकुण १६८१ वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्या धुळवडीचा रंग पोलिसांनी उतरवला.