ठाणे: मशिदीवरील भोंगे काढण्यावरून मविआ सरकारला अल्टीमेटम दिल्यानंतर आघाडीतील नेत्यांनी केलेल्या टिकेला उत्तर देण्यासाठी २०२२ मध्ये आयोजित केलेल्या ठाण्यातील उत्तर सभेमध्ये रत्नजडीत तलवार उंचावल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह ७ ते ८ जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्याच्या सुनावणीसाठी येत्या गुरुवारी (ता.११ डिसे.) राज ठाकरे ठाणे न्यायालयात हजर राहणार आहेत. या गुन्हयात राज ठाकरे यांच्यासह मनसे नेते अविनाश जाधव आणि शहर अध्यक्ष रवींद्र मोरे हे देखील आरोपी आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २०२२ साली शिवतीर्थावर आयोजित गुढी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे काढण्याचे आणि मदरशांवर धाडी टाकण्याची भूमिका मांडुन तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला अल्टीमेटम दिला होता. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले होते. तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. महाआघाडीमधील इतर नेत्यांसह वंचित आघाडीकडुनही राज यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले होते. या सर्व आरोप-प्रत्यारोपांना सडेतोड उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांची १२ एप्रिल २०२२ रोजी ठाण्यात उत्तर सभा झाली होती.
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथील डाॅ. मूस रस्त्यावरील चौकात पार पडलेल्या या उत्तर सभेमध्ये राज ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी राज यांना रत्नजडीत तलवार भेट दिली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी व्यासपीठावर तलवार म्यानातून काढून हवेत उंचावली होती.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर नौपाडा पोलीस ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह ७ ते ८ जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी ठाणे न्यायालयात होणार असल्याने गुरुवारी राज ठाकरे हजर राहणार आहेत.