रिक्षा चालकाच्या मुलाची उत्तुंग भरारी
शहापूर: शहापूर तालुक्यातील उंबरखांड गावातील युवक राहुल निमसे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवत ओबीसी प्रवर्गातून राज्यात पहिला येण्याचा मान मिळविला आहे.
नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्यात राहुलने आपल्या अथक मेहनतीच्या जोरावर यश संपादन केले आहे. राहुलचे वडील केशव निमसे यांचा रिक्षा चालविण्याचा व्यवसाय असून रात्रंदिवस मेहनत करून त्यांनी मुलाच्या शिक्षणासाठी पैसे पुरविले. राहुलने सतत १४ ते १६ तास अभ्यास करून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले. कठीण परिश्रम, योग्य अभ्यास पद्धती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी हा यशाचा टप्पा गाठला.
एमपीएससी परीक्षेसाठी आवश्यक असलेला सखोल अभ्यास, सराव चाचण्या आणि स्मार्ट स्टडी प्लॅन यांचा योग्य समन्वय साधून त्यांनी आपले ध्येय गाठले. राहुल निमसे यांच्या या ऐतिहासिक यशामुळे शहापूर तालुक्यात तसेच त्यांच्या गावी उंबरखांडमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. या यशाबद्दल राहुल व त्याच्या कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यश संपादन केल्यानंतर राहुल निमसे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, ही स्पर्धा परीक्षा कठीण असली तरी योग्य नियोजन, सातत्यपूर्ण मेहनत आणि आत्मविश्वास असल्यास नक्कीच यश मिळते. भविष्यातील सर्व स्पर्धा परीक्षार्थींनी कधीही हार मानू नये आणि आपल्या ध्येयावर केंद्रित राहावे, असेही ते म्हणाले.