नवी दिल्ली: काँग्रेस निवडणूक समितीची बैठक दिल्लीत पार पडली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली. या बैठकीत राहुल गांधींसोबत काय चर्चा झाली, याबद्दल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना माहिती दिली.
योग्य पद्धतीने तुम्ही वाटाघाटी केल्या नाही म्हणून जागावाटपाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी नाराज झाले, अशी चर्चा आहे. असा प्रश्न नाना पटोले यांना दिल्लीत माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले, “काँग्रेस पक्ष माध्यमांच्या माध्यमातून टार्गेट केला जातो, असंच आम्हाला दिसत आहे. आमचे नेते राहुल गांधींनी… बरोबर आहे की, महाराष्ट्रात काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या पाहिजे. विशेषकरून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई या भागात काँग्रेसला जास्त जागा मिळायला पाहिजेत मेरिटच्या आधारावर. पण, आघाडी आमच्या तीन पक्षांची आणि आमचे अजून मित्रपक्ष, या सगळ्यात हा घोळ झाला. आम्ही त्यांना त्या पद्धतीने समजावून सांगितले. त्यांनी समाधान व्यक्त केले”, असे उत्तर नाना पटोले यांनी दिले. “सोशल इंजिनिअरिंग हा राहुल गांधींचा विशेष भाग आहे. देशातील, राज्यातील सगळ्या लोकांना प्रतिनिधित्व मिळावे, ही अपेक्षा राहुल गांधींची आहे. सगळ्यांना सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे, ही भूमिका राहुल गांधींची आहे. तर जो जागावाटपाचा मुद्दा आहे, ज्या-ज्या भागात कम्युनिटीचं मेरिट आलेलं आहे, त्या हिशोबाने आम्ही जास्तीत जास्त ओबीसी लोकांना तिकीट देण्याचा प्रयत्न केला आहे”, असे ते म्हणाले.
“महाविकास आघाडीमध्ये मेरिटनुसार त्या-त्या जागा त्या-त्या पक्षाला मिळाव्यात अशी आमची भूमिका आहे. अजूनही आमची चर्चा सुरू आहे. बाळासाहेब थोरात उद्या उद्धव ठाकरेंकडे जाऊन थोड्याफार जागांबद्दल चर्चा करतील आणि उद्याच राहिलेल्या जागांवरील निर्णय घेतला जाईल”, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.