शिवाईनगरच्या शाखेसाठी शिंदे-ठाकरे गटात राडा

शाखांच्या ताब्यावरून वातावरण पेटणार

ठाणे : लोकमान्य नगर येथील शिवसेनेची शाखा ताब्यात घेतल्यानंतर सोमवारी रात्री शिंदे गटाने शिवाई नगर येथील शाखा ताब्यात घेतल्याने शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार राडा झाला. यामुळे या भागातील वातावरण तंग झाले होते.

काल शिवाईनगर भागात शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम झाल्यानंतर म्हस्के आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी शिवाई नगर येथील शिवसेनेच्या शाखेचे कुलूप तोडून शाखेत प्रवेश केला आणि ठाण मांडून बसले. या घटनेची माहिती ठाकरे गटाचे भास्कर बैरी शेट्टी, रागिणी शेट्टी यांना समजताच या भागातील शिवसेनेच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी धाव घेऊन शाखेतून श्री. म्हस्के यांना बाहेर काढा, अशी मागणी केली. त्यावरून दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याने वर्तकनगर पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला. शाखा आमचीच असल्याचा दोन्ही गटाकडून दावा करण्यात येत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही गट आक्रमक झाले होते. अखेर श्री.म्हस्के यांनी या शाखेला टाळे ठोकून त्याची चावी स्वतःकडे ठेऊन घेतली, त्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. त्यांनी शाखा ताब्यात घेणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी वर्तकनगर पोलिस ठाणे गाठले. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात हे शिवसैनिक बसले होते, परंतु पोलिसांनी कोणाच्याही विरोधात गुन्हा दाखल केला नाही.

याबाबत खासदार राजन विचारे याच्यशी संपर्क साधला असता ते म्हणाले की शिवसेनेच्या कोणत्याही मालमत्तेवर दावा सांगणार नाही, असे प्रतिज्ञापत्र शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दिले आहे. तरी देखील ५० वर्षांपूर्वी बांधलेल्या शिवाई नगर, लोकमान्य नगर येथील शाखा पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्याचा प्रकार सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया विचारे यांनी दिली.

शिंदे गटाचे श्री. म्हस्के म्हणाले की शिवसेना ही आमची आहे. आ. प्रताप सरनाईक यांनी ही शाखा बांधली होती. येथे आमचे कार्यकर्ते बसतात, त्यामुळे त्या गटाला कोणत्याही प्रकारचा दावा सांगण्याचा हक्क नाही, असे म्हणाले.