बांधकामाचे कंत्राट घेण्यावरून पुन्हा राडा; डंपरची तोडफोड

शिवसेनेतील आमदार, नगरसेवक समर्थक पुन्हा भिडले

ठाणे : ठाण्यातील वर्तकनगर परिसरात सुरू असणाऱ्या बांधकाम साईटवरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक आणि माजी गटनेते दिलीप बारटक्के यांचे समर्थक पुन्हा एकदा आपापसात भिडल्याची घटना शुक्रवारी घडली.

वर्तकनगर प्रभाग समिती समोरील बिर्ला कंपनी येथील बांधकाम कंत्राटावरून या दोन्ही गटांमध्ये अनेक महिन्यापासून वाद सुरू आहेत. शुक्रवारी या बांधकाम साईटवरून काही डंपर जात असताना आमदार सरनाईक समर्थकांनी ते अडवले आणि डंपरची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. यात डंपरचे नुकसान झाले आहे. यावेळी मोठा जमाव जमून काही काळ वातावरण तंग झाले होते. मात्र पोलिसांनी तत्काळ दोन्ही गटाला पांगवले. घटनास्थळी दोन्ही बाजूने कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते. दरम्यान याप्रकरणी आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः मध्यस्थी करून हा वाद मिटवावा अशी मागणी करण्यात येत आहे.

ठाणे शहरातील बंद पडलेल्या कंपन्यांच्या जागेवर मुंबईतील गिरणी कामगारांच्या धर्तीवर ५०० फुटांची घरे व त्या ठिकाणी स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी सत्ताधारी पक्षातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी वर्तक नगर येथील बिर्ला कंपनीच्या गेटवर आंदोलन केले होते. यावेळी शिंदे गटातीलच माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी देखील कंपनीच्या आतमध्ये आंदोलन केले होते. केवळ आम्हाला येथील काम मिळाले असल्याने तेच खुपल्याने आमदारांनी हे आंदोलन केल्याचा आरोप त्यावेळी बारटक्के यांनी केला होता. तर स्थानिकांना न्याय मिळावा या हेतूने हे आंदोलन केल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले होते.

वर्तकनगर भागात बिर्ला कंपनी बंद असून त्याठिकाणी विकासकाच्या माध्यमातून काम सुरु झाले आहे. याठिकाणी आम्ही स्थानिक याच नात्याने दोन वर्षापूर्वी काम घेतल्याचा मुद्दा बारटक्के यांनी यापूर्वीच उपस्थित केला आहे. स्थानिकांना न्याय मिळावा, कंपनी बंद पडलेल्यांना रोजगार मिळावा, त्यांना घरे मिळावीत असा यामागचा हेतू असल्याचे आमदार सरनाईक यांनी स्पष्ट केले होते. मात्र शुक्रवारी हा वाद पुन्हा उफाळून आला.