दोन दिवस सुट्ट्यांमुळे कळवा रुग्णालयात रुग्णांच्या रांगा रस्त्यावर

ठाणे : मागील आठवड्यात शुक्रवार आणि रविवार या दिवशी सुट्ट्या असल्याने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग बंद होता, त्यामुळे आज सोमवारी २८०० रुग्ण आल्याने त्यांची रांग प्रवेशद्वाराबाहेर रस्त्यावर आली होती.

दररोज बाह्य रुग्ण कक्षात दोन हजारांच्या आसपास रुग्ण येतात. परंतु सोमवारी दोन हजार ८०० रुग्ण तपासणीसाठी आले होते. गेल्या आठवड्यात शुक्रवार आणि रविवार या दोन दिवशी सुट्ट्यांमुळे बाह्य रुग्ण कक्ष बंद ठेवण्यात आल्याने रुग्णांच्या रांगा वाढल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

नागरिकांच्या तक्रारीनंतर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रुग्णालयातील ठेकेदार बदलून स्वच्छता व्यवस्थेत बदल केले. त्याचबरोबर रुग्णालयात दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा कशा मिळतील, यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. हे बदल होत असताना दुसरीकडे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांच्या रांगा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरपर्यंत गेल्याचे चित्र दिसून आले.

कळवा रुग्णालयातील बाह्य रुग्ण कक्षात दररोज १५०० च्या आसपास रुग्ण तपासणीसाठी येत होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून या रुग्ण संख्येत वाढ होऊन दररोज दोन हजारांच्या आसपास रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. रुग्णालयात सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० यावेळेत केसपेपर काढण्याची वेळ असते तर, सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत बाह्य रुग्ण कक्ष सुरू असतो. त्याचबरोबर औषध कक्ष सकाळी ९ ते दुपारी दोन या वेळेत सुरु असतो. या सर्वच ठिकाणी सोमवारी रुग्णांच्या लांब रांगा लागल्या होत्या. सुमारे २८०० रुग्ण तपासणीसाठी आले होते. यामुळे रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरील रस्त्यावर रुग्णांच्या रांगा गेल्या होत्या.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी महाशिवरात्रीची सुट्टी होती. या दिवशी बाह्य रुग्ण कक्ष बंद होता. शनिवारी हा कक्ष सुरु होता. त्यादिवशी १९०० रुग्ण तपासणीसाठी आले होते. पुन्हा रविवारी बाह्य रुग्ण कक्ष बंद ठेवण्यात आल्याने सोमवारी रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगा वाढल्या होत्या.