अंबरनाथ : अंबरनाथ येथील जैव-वैद्यकीय कचऱ्याच्या भस्मीकरण प्रकल्पाला नागरिकांच्या होणाऱ्या विरोधाची दखल शासनाने घेतली असून प्रकल्प आरोग्याला घातक असल्यास तत्काळ स्थगिती देण्याची भूमिका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दर्शवली आहे.
मानखुर्द आणि शिवाजीनगर भागातील प्रदूषणाची समस्या लक्षात घेता येथील एसएमएस एन्व्होक्लीन कंपनीचा बायोमेडिकल वेस्ट (जैव-वैद्यकीय कचरा) भस्मीकरण प्रकल्प अंबरनाथ एमआयडीसी औद्योगिक वसाहतीत स्थलांतरित करण्यात आला आहे. या प्रकल्पाला आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या सोबत अंबरनाथकरांनी देखील तीव्र विरोध केल्यानंतर या विरोधाची दखल उद्योगमंत्री सामंत यांनी घेऊन आज बुधवारी एका विशेष सभेचे आयोजन केले होते. यावेळी प्रकल्प आरोग्यासाठी घातक असल्यास तत्काळ स्थगिती देऊ, अशी भूमिका सामंत यांनी यावेळी मांडली.
मानखुर्द-शिवाजीनगर येथील बायो-मेडिकल वेस्ट प्रकल्प अंबरनाथ एमआयडीसीमध्ये हलवण्याचा निर्णय स्थानिकांच्या आरोग्याच्या तक्रारींनंतर घेण्यात आला. या प्रकल्पाच्या स्थलांतरासाठी २१ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. मानखुर्द परिसरात निवासी भाग जवळ असल्याने बायोमेडिकल कचऱ्याच्या भट्टीतून होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा प्रकल्प अंबरनाथ एमआयडीसी मध्ये स्थलांतरित करण्यात आला आहे. मात्र या प्रकल्पाला शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी विरोध केला. तसेच उबाठाचे पदाधिकारी अनिल भोईर यांनी देखील सह्यांची मोहीम राबवली होती. या प्रकल्पाला अंबरनाथकरांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन उद्योगमंत्री सामंत यांनी बैठक घेतली. यावेळी नगरपालिका व लोकप्रतिनिधींनी एकत्र बैठक आयोजित करून संबधित कंपनीच्या संचालकांशी चर्चा करावी आणि प्रकल्प समजावून घ्यावा. त्यानंतर समाधान न झाल्यास तत्काळ या प्रकल्पाला स्थगिती देण्यात येईल, अशी भूमिका सामंत यांनी या बैठकीत मांडली. त्यामुळे लवकरच अंबरनाथ नगरपालिकेत बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आमदार डॉ. किणीकर यांनी सांगितले.
या बैठकीला नगराध्यक्ष तेजश्री करंजुले-पाटील, प्रांत अधिकारी विजयानंद शर्मा,अंबरनाथ नगरपरिषदचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, लोकप्रतिनिधी तसेच एमआयडीसीचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.