ठाणे: ठाणेवैभव क्रिकेट करंडक स्पर्धेच्या क गटातील प्रथम फेरीत एटी स्पोर्ट्स संघाने तब्बल २३५ धावांनी विजय मिळवला. तर एटी स्पोर्ट्सच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे पीडब्ल्यूडीचा संघ अवघ्या १०६ धावांत ढासळला.
एटी स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय फलंदाजांनी सार्थ ठरवत ३५ षटकांत फक्त चार गडी गमावून ३४१ धावांचा डोंगर रचला. एटी स्पोर्ट्सचा शिवम घोष याने १२ चौकार आणि सहा षटकारांच्या साह्याने १०४ धावा केल्या. फरदीन शेखने १० चौकारांसह ८२ धावा फटकावल्या. दुखापतीमुळे त्याला तंबूचा रस्ता धरावा लागला, त्यामुळे त्याचे शतक हुकले. मित मयेकर याने सहा चौकार आणि तीन षटकारांच्या सहाय्याने ५६ धावांची भर घातली तर कौशिक शुक्ला आणि अमोल तोरवी यांनी अनुक्रमे ३८ आणि ३३ धावा केल्या. एटी स्पोर्ट्सने ३५ षटकांत चार गडी गमावून ३४१ धावा केल्या. पीडब्ल्यूडीच्या एन.एम.पवार याने सात षटकांत ८४ धावा देत दोन बळी घेतले तर आयुष मोगल आणि कृष्णकांत पवार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
एटी स्पोर्ट्सच्या ३४१ धावांचे आव्हान पीडब्ल्यूडीच्या फलंदाजांना पेलता आले नाही. एटी स्पोर्ट्सच्या गोलंदाजांपुढे पीडब्ल्यूडीच्या एकही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. राहुल शेडगे या एकमेव फलंदाजाने सर्वाधिक ३१ धावा केल्या. अवघ्या २१ षटकांत पीडब्ल्यूडीचा संपूर्ण संघ १०६ धावांत गडगडला. एटी स्पोर्ट्सच्या मीत मयेकरने सहा षटकांत २२ धावा देत चार गडी बाद केले. आशिष यादवने पाच षटकांत २४ धावा देत तीन गडी बाद केले तर आदित्य चौरसिया याने सहा षटकांत दोन गडी बाद केले.