नाका तिथे हळदी कुंकू

नवी मुंबई -:आजच्या आधुनिक युगात हळदी म्हटले की मोठ मोठे सेलिब्रिटी, मोठे व्यासपीठ,मोठे वाण अशी परंपरा रूढ होत चालली आहे.मात्र कोणतेही व्यासपीठ, मनोरंजनाचा सांस्कृतिक कार्यक्रम किंवा सेलिब्रिटी  नसलेले  हळदी कुंकू तेही एक दिवस नाही तर तब्बल १५ साजरा करण्यात आला आहे.प्रभात ट्रस्टच्या माध्यमातून महिला नाका  कामगारांसाठी या हळदी कुंकुचे आयोजन करण्यात आले होते.
रोज बदलणारे स्थळ पण उत्साह मात्र तोच. हातावरचे पोट असणाऱ्या, दैनंदिन मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा हाकणाऱ्या  महिला नाका कामगार  ज्या ठिकाणी जमतात त्या नाक्यावरच..सामाजिक जाणीवाची विण अधिक घट्ट करणारा प्रभातचा हा उपक्रम २६ जानेवारी पासून रथसप्तमी पर्यंत पार पडला.२५ प्रभात सहयोगी महिला या उपक्रमात सहभागी झाल्या तसेच ५८५नाका कामगार महिलांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.या उपक्रमाचे नियोजन डॉ.अश्लेषा थोरात, संगीता हिरवे व सौ मोहिते काकी यांनी केले. समाजातील वंचित घटकांना जोडणाऱ्या प्रभातच्या उपक्रमात आपणही सहभाग घ्यावा असे आवाहन प्रभात ट्रस्ट चे डॉ प्रशांत थोरात यांनी केले आहे.