किरकोळ बाजारात कडधान्य-डाळी कडाडल्या

डाळी ३० ते ३५ टक्के तर कडधान्ये २० ते २२ टक्के महागले

नवी मुंबई: यंदा गुजरात आणि महाराष्ट्रातून दाखल होणाऱ्या डाळींच्या उत्पादनाला पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे घाऊक बाजारात आवक घटली असल्याने मागणीत वाढ होत आहे.परिणामी बाजारात डाळी ३० ते ३५ टक्के तर कडधान्ये २० ते २२ टक्के कडाडले आहेत. तूरडाळीने १५०चे भाव गाठला असून काबुली चणे १५०हून अधिक भावाने विक्री होत आहे.

यंदा श्रावण अधिक मास तसेच आता मुख्य श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. या दिवसात शाकाहार अधिक होत असल्याने भाज्यांसह कडधान्याच्या मागणीत वाढ होते. एपीएमसी बाजारात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून डाळी दाखल होतात. आणि त्यानंतर त्या मुंबई आणि उपनगरातील किरकोळ बाजारात वितरीत होतात. यंदा मात्र पावसामुळे उत्पादनाला फटका बसला असून बाजारात डाळींची आवक घटली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात डाळीं ३० ते ३५ टक्के तर कडधान्ये २० ते २२ टक्के कडाडले आहे. तूर डाळीने १५०चा भाव गाठला आहे तर काबुली चणे १५०हून अधिक दराने विक्री होत आहे.

किरकोळ बाजारात प्रतिकिलो तूरडाळ आधी ११५-१२० रुपयांवरून आता १५० रुपये तर मुगडाळ ९० रुपयांनी उपलब्ध होती ती आता १००रुपयांवर पोचली आहे. चणाडाळ ५५-६० रुपये होती ती आता ८०-८५ रुपयांनी विक्री होत आहे, तर कडधान्यामध्ये काबुली चणे १००-१२० रुपयांनी उपलब्ध होते ते आता १५०-१६० रुपये आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात डाळी चढ्या दराने विक्री होत असल्याने सर्वसामान्य महिलांच्या किचनचे बजेट पुरते कोलमडले आहे.

यंदा श्रावण अधिक मास आणि मुख्य श्रावण असे दोन महिने पडले आहेत. या दिवसात मोठ्या प्रमाणात शाकाहार केला जातो. त्यामुळे आम्ही भाजीपाल्यासह डाळींना अधिक प्राधान्य देतो. मात्र सध्या कडधान्ये, डाळींचे दर वाढले असल्याने किचनचे बजेट कोलमडले आहे, अशी प्रतिक्रिया गृहिणी सायली शिगवण यांनी दिली.

डाळी आता आधी
तूरडाळ १५० १२०-११५
मुगडाळ १०० ९०
मसूर डाळ ८०-९० ६५-७०
चणाडाळ ८०-८५ ५५-६०

कडधान्य
काबुली चणे १६०-१७० १००-१२०
सफेद वाटाणा ७५-८० ६०-६५
हिरवा वाटाणा ९०-१०० ७०-८०
काळा वाटाणा ७०-७५ ६०