महिला सुरक्षेला प्राधान्य; ड्रग्ज-सायबर गुन्ह्यांवर लक्ष

नवनियुक्त पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी स्पष्ट केला इरादा

ठाणे : अल्पवयीन मुलींसह महिलांवरील गुन्हे, अमली पदार्थांचे सेवन आणि वाढते सायबर गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी प्राधान्य देणार अशी ग्वाही ठाण्याचे नवनियुक्त 25 वे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

गुरुवारी दुपारी ठाण्याचे मावळते आयुक्त जयजित सिंह यांनी पदभार सोडल्यानंतर श्री. डुंबरे यांनी हा पदभार स्विकारला. नागपुरातील हिवाळी राज्य अधिवेशन संपल्यानंतरच, गुरुवारी दुपारी 12.30 च्या सुमारास श्री. डुंबरे यांनी जयजित सिंग यांच्याकडून ठाणे पोलीस दलाचा पदभार स्वीकारला.

यापूर्वीही ठाणे शहरात काम केल्याचे सांगताना डुंबरे म्हणाले की, त्यांना शहराची माहिती आहे. यास्तव महिलांची सुरक्षितता, वाढते सायबर गुन्हे, अंमली पदार्थांचे व्यसन आदी महत्वाच्या बाबींवर विशेष लक्ष ठेवणे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पोलीस वसाहती आणि पोलीस निवासस्थानांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम असून ते आव्हानात्मकही आहे. ही जबाबदारी चोखपणे पार पाडण्याबरोबरच गुन्हेगारीचे प्रमाण कसे कमी करता येईल, ठाणेकरांचे संरक्षण कसे करता येईल, यावर अधिक भर दिला जाणार आहे,अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.

ठाणेकरांसाठी मुख्यत्वे वयस्करांकरीता काम करणार आहे. भागोलिक रचना आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून ठाणे हे एक सुंदर शहर आहे. ठाणेकर हुशार आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत कामाचा आढावा घेतला जाणार आाहे. तत्पुर्वी, ठाण्याच्या समस्या आणि गुन्हे जाणून घेऊन त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल. ठाणे हे विकासासाठी ओळखले जात होते. पण पूर्वीच्या तुलनेत याचा खूप विकास झाला आहे. ठाण्यातील वाहतूक समस्येबाबत डुंबरे म्हणाले की, ती सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.

ठाण्यात सहपोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी शहरातील वाहतूक नियोजन सुरळीत करण्यासाठी पावले उचलली होती. घरात एकटे राहणा-या ज्येष्ठ नागरिकांवर होणारे अत्याचार, लुटमार आदी गुन्हे रोखण्यासाठी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू केली होती. केवळ हेल्पलाइन सुरू करण्यापुरते मर्यादित राहिले नाहीत. त्यांनी सामाजिक संस्थांच्या मदतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘कर्तव्य’ ही मोहिम सुरू केली होती व घोडबंदर येथील कासारवडवली भागात एका तरुणाने आपल्याच कुटुंबातील 11 जणांची हत्या करून आत्महत्या केल्याच्या गुन्ह्याची उकल करुन त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.