अंबरनाथ: प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आलम खान यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.
भाजपाचे प्रदेश सदस्य गुलाबराव करंजुले-पाटील यांच्याशी चर्चा करत शहराच्या विकासासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी भाजपला पाठिंबा दिला आहे. भारतीय जनता पक्ष आणि रिपाइं महायुतीच्या उमेदवार तेजश्री करंजुले या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचे शहर विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून आलम खान यांनी भारतीय जनता पार्टीला बिनशर्त जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. यावेळी भाजपा महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले-पाटील यांची भेट घेतल्यानंतर आलम खान यांचा सन्मान करण्यात आला.
प्रहार जनशक्ती पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष आलम खान यांच्यासह उपशहर प्रमुख दीपक पाटील, अमरनाथ पाल, खुशाल सोनकांबळे, विशाल गायकवाड, शफिक सलमान तसेच सलून संघटने अध्यक्ष इब्राहिम शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी जाहीर पाठिंबा दिला आहे.
आरपीआय पुन्हा भाजपसोबत
भाजपा आणि आरपीआय (आठवले गट) यांच्यामधील गैरसमजुतीतून निर्माण झालेले वाद मिटले असून आरपीआयने पुन्हा भाजपाबरोबर युतीत रहाण्याचा निर्णय घेतला आहे.
अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरपीआय आठवले गटाने भाजपचा पाठिंबा काढून घेत असल्याची घोषणा केली होती. महायुतीत घटकपक्ष असलेल्या आरपीआय आठवले गटाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर पाठिंबा काढुन घेण्याची घोषणा करताच शहरातील राजकारणात चर्चांना उधाण आले होते. मात्र अवघ्या २४ तासांत आरपीआय आठवले गटाने निर्णय मागे घेत भाजपासमवेत रहाण्याचे ठरवले आहे.
आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानंतर आरपीआय गटाने पुन्हा एकदा भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे भाजप प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले आणि आरपीआयचे अंबरनाथ शहर अध्यक्ष दीपक धनवडे यांनी जाहीर केले.
नगरपालिका निवडणुकीत निवडून आल्यास भाजपने आरपीआयला एक स्वीकृत सदस्य देण्यास मान्यता दिल्यानंतर हा पाठिंबा लेखी आश्वासनानंतर पुन्हा देण्यात आल्याचे आरपीआयचे शहराध्यक्ष धनवडे यांनी सांगितले. या निर्णयामुळे अंबरनाथमधील भाजपची ताकद आणखी वाढल्याचे बोलले जात आहे.