राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी प्रफुल पटेल

मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल पटेल यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. सर्व तांत्रिक बाबी तपासून प्रफुल पटेल यांना उमेदवारी देण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.

प्रफुल पटेल निवडून आल्यानंतर ते आपल्या आधीच्या सदस्यपदाचा राजीनामा देतील. त्यानंतर मे महिन्यात प्रफुल पटेल यांच्या आधीच्या टर्मसाठी मे महिन्यात पुन्हा निवडणूक होईल. तेव्हा भाजपा आणि शिवसेनेशी चर्चा करून, त्या जागेबाबत निर्णय घेऊ, असेही सुनील तटकरे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना १५ दिवसांची मुदतवाढ दिली होती. त्याप्रमाणे विधानसभा अध्यक्ष उद्या १५ फेब्रुवारी रोजी आपला निकाल जाहीर करतील. आम्ही जी काही कायदेशीर बाजू होती, ती मांडलेली आहे, असेही सुनील तटकरे यावेळी म्हणाले. तसेच निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यामुळे तिथेही आम्ही कायदेशीर लढाई लढण्याची तयारी ठेवली आहे, असेही सुनील तटकरे माध्यमांशी बोलताना म्हटले.

देशभर लोकसभा निवडणुकांचा माहौल असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या महाराष्ट्रासह १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार, २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. तर, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली.

भाजपाने अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मिलिंद देवरा यांचे नाव जाहीर केले आहे. महाराष्ट्रातील एकूण सहा जागा रिक्त होत आहेत. त्यापैकी पाच जणांची नावे जाहीर झालेली आहेत. महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून आणखी एक नाव येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तत्पूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, यावेळी राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध होऊ शकते.