मुंब्रा-कळव्यात नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त शक्तिप्रदर्शन

* ५०० बाईक, १००च्या वर फोर व्हिलर आणि हजारो कार्यकर्त्यांचा मार्च
* पक्षाने आदेश दिल्यास कळवा-मुंब्रा विधानसभा लढविणार-नजीब मुल्ला

ठाणे : विद्यमान आमदाराने कळवा-मुंब्रा परिसर भकास केल्याने खराखुरा विकास करण्यासाठी पक्षाने उमेदवारी दिल्यास कळवा-मुंब्रा विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व, अल्पसंख्यांक विभागाचे निरीक्षक नजीब मुल्ला यांनी आपल्या वाढदिवसाचा समारोप करताना कळवा नाक्यावरील विराट सभेत बोलताना व्यक्त केले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, रीटा यादव, वहिदा खान, अंकिता शिंदे, राजन किणे, अनिता किणे, उमेश पाटील, गणेश कांबळे, महिला अध्यक्ष वनिता गोतपागर, युवक अध्यक्ष विरु वाघमारे, कार्याध्यक्ष संदेश पाटील, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, हिंदी भाषिक सेलचे अध्यक्ष राजनाथ यादव, सामाजिक न्याय विभागाचे मंगेश सूर्यवंशी, वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष रोशन जाधव, ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, परिवहन सदस्य नितिन पाटील, मोहसिन शेख, तकी चेऊलकर, शेहबाज तकी चेऊलकर, महिला ब्लाॅक अध्यक्षा पल्लवी गीध आदींसह सर्व फ्रंटल, सेल, विभागाचे जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

विद्यमान आमदाराने कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्र भकास ठेवलेला आहे. पाण्याचा बिकट प्रश्न, वीजेचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न आदी महत्वाचे प्रश्न अजुनही बिकट आहेत. येथे फक्त खास लोकांना टक्केवारीचे, भ्रष्टाचाराचे राजकारण व धार्मिक सलोखा बिघडविण्याचे काम गेल्या तीन टर्ममध्ये विद्यमान आमदाराने केले. यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी दिली, पक्षाने आदेश दिला, उमेदवारी दिली तर लोकांच्या आग्रहाखातर कळवा-मुंब्रा विधानसभेच्या विकासासाठी येथुन निवडणूक लढविणार असल्याचे उद्गार नजीब मुल्ला यांनी काढले.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी मुंब्रा कळव्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मुंब्रा येथील आत्माराम चौक येथून निघालेल्या विशाल रॅलीत ५०० बाईक, १००च्या वर फोर व्हिलर आणि हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. या रॅलीची सुरुवात मुंब्रा रेतीबंदर येथून होऊन मुंब्रा रेल्वे स्टेशन, मुंब्रा पोलीस स्टेशन, कौसा ते वाय जंक्शनपर्यंत गेली. तेथून ती कळवा नाक्यावरुन फुले नगर, सह्राद्री सोसायटी, खारीगाव, पारसिक नगर ते पौंड पाडा, घोलाई नगर, भास्कर नगर, आतकोनेश्वर नगर, कळवा पूर्व येथे काढण्यात आली. ही संपूर्ण रॅली, ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिशबाजीत, नजीब मुल्ला व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयजयकाराच्या घोषणा देत पुढे सरकत होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात ठाणे येथील मध्यवर्ती पक्ष कार्यालयात साजरा करण्यात आला. या वेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नजीब मुल्ला यांचे औक्षण केले तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांनी नजीब मुल्ला यांना शुभेच्छा दिल्या. तसेच नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त, पारसिक वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने कै. सुभाष तारी स्मृती चषक पारसिक प्रिमियर लीग २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, सुनिल पाटील, सौ. पल्लवी गिध, समीर आडकर, दिनेश बने, चेतन शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष मंगेश सूर्यवंशी यांच्या हस्ते एक हजार महिलांना साडी वाटप करण्यात आले. तर वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष रोशन जाधव यांच्या हस्ते ५०० कुटूंबांना धान्यवाटप करण्यात आले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले.