1500 मेगावॅटचा वीज प्रकल्प प्रस्तावित
शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील कळभोंडे गावानजीक लादेची वाडी येथे तर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील जामुंडे गावात घाटघर प्रकल्पाच्या धर्तीवर १५०० मेगावॅटचा वीज निर्मिती प्रकल्प होणार आहे.
या प्रकल्पासाठी प्रत्यक्षात जागेवरील झाडांची आणि वनखात्याच्या क्षेत्राची मोजणी झाली आहे. शिवाय अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण विषयक जनसुनावणी देखील घेण्यात आली.या प्रकल्पाचे प्रस्तावक म्हणुन जेएसडब्ल्यू एनर्जी पीएसपी टू लि.कंपनी असून ईक्यूएमएस ग्लोबल प्रा.लि. कंपनीने प्रस्ताव सादर केला आहे.
शहापूर तालुक्यातील चोंढे हद्दीतील घाटघर जलविद्युत प्रकल्पाच्या २५० मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पानंतर आता इगतपुरीमधील जामुंडे तर शहापुरातील कळभोंडे या भागात तब्बल १५०० मेगावॅटचा वीज निर्मिती प्रकल्प प्रस्तावित असून हा प्रकल्प उपलब्ध असलेल्या अक्षय ऊर्जेचा वाटा वाढविण्याच्या दृष्टीने ठरवलेला आहे. या प्रकल्पासाठी डॅम, जलाशय आणि इतर कामांसाठी २७८.९२ हेक्टर जमिनीची आवश्यकता असून यामध्ये खाजगी जमीन ३५.१८ हेक्टर व वनजमीन २४३.७४ हेक्टर आहे.सर्वेअंती या ठिकाणी झाडांच्या ८४ प्रजाती, झुडपांच्या ४१, वन औषधींच्या ४० तर गवताच्या १८ प्रजाती तर ४९ पक्ष्यांच्या प्रजातींचे निरीक्षण करुन नोंद करण्यात आली आहेत. दरम्यान या वीज प्रकल्पामुळे २४७.७४ हेक्टर जंगलाचे नुकसान होऊन येथील १० कुटूंबे विस्थापित होणार आहेत. यामुळे बांधकामादरम्यानच्या आवाजामुळे या क्षेत्रातील प्राण्यांना देखील त्रास होण्याची शक्यता आहे.
सदर वीज प्रकल्प करण्यापूर्वी आमच्या ग्रामपंचायत हद्दीत पाणी, रस्ते तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा. तसेच अहवालानुसार १० कुटूंबे विस्थापित होणार असल्याचे दाखविले असले तरी एकूण २७ कुटूंबे विस्थापित होणार असून या सर्वच कुटुंबांना न्याय मिळायला हवा, असे कळभोंडे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी विर यांनी सांगितले.
प्रकल्पाचा तपशील
* प्रकल्पाचे नाव: भावली पंप स्टोरेज प्रकल्प
* प्रकल्पाचे स्थान: ठाणे व नाशिक या दोन जिल्ह्यांमध्ये.
* प्रकल्पाची क्षमता: 1500 मेगावॅट
* वरील धरणाचा प्रकार: रॉक फील डॅम
* वरील धरणाची लांबी/उंची: 954.50मी/48मी.
* खालील धरणाचा प्रकार: काँक्रिट गुरुत्वाकर्षण धरण
* खालील धरणाची लांबी/उंची – 462 मी./72मी.
* इनटेक टनेल: 7 मीटर व्यास/67 मीटर लांब
* प्रकल्पाची अंदाजे किंमत: 9050.09 कोटी