बांगलादेशात रचला जात होता कट
नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानच्या दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी), पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) आणि बांगलादेशस्थित अतिरेकी संघटनांशी कथित संबंध असलेल्या एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधून आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे.
तपासकर्त्यांना संशय आहे की हा गट परदेशी हँडलर्सच्या निर्देशाखाली भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखत होता. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
तामिळनाडूच्या तिरुप्पूर जिल्ह्यातील गारमेंट युनिट्समधून मिजानुर रहमान, मोहम्मद शबत, उमर, मोहम्मद लिटन, मोहम्मद शाहिद आणि मोहम्मद उज्जल अशी सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले, तर इतर दोघांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. पोलिसांनी सांगितले की अटक केलेल्यांपैकी काही बांगलादेशी नागरिक आहेत. ते ओळख लपवण्यासाठी बनावट आधार कार्ड वापरत होते.
पोलिस सूत्रांनुसार, हे मॉड्यूल लष्कर-ए-तोयबाशी जोडलेले आहे आणि त्याचा हँडलर हा काश्मीरचा रहिवासी आहे जो सध्या बांगलादेशातून कार्यरत आहे. हँडलरला पाकिस्तानमध्ये दहशतवादी प्रशिक्षण मिळाले असल्याचे मानले जाते आणि अटक केलेले आठ संशयित त्याच्या इशाऱ्यावर काम करत होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दिल्लीसह अनेक शहरांची हेरगिरी करणारे मोबाईल फोन व्हिडिओ जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या संघटनेकडून दिल्लीतील गर्दी असलेल्या धार्मिक आणि वारसा स्थळांना लक्ष्य करण्याचा संभाव्य दहशतवादी कट रचल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी राष्ट्रीय राजधानीत हाय अलर्ट जारी केला. त्यानंतर ही अटक करण्यात आली. सूत्रांनी सांगितले की, विशिष्ट माहितीवरून असे दिसून आले आहे की चांदणी चौक परिसरातील एक मंदिर हे संभाव्य लक्ष्य होते, दहशतवादी लाल किल्ल्याजवळील परिसरासह संवेदनशील ठिकाणी आणि आसपासच्या भागात इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (आयईडी) हल्ला करण्याची योजना आखत आहेत.