मध्यमवर्गाला ‘राज’कारणात स्थान

महाराष्ट्रात शिवसेना नेस्तनाबूत करण्याचा भाजपाचा डाव आता त्यांच्या हेतूबद्दल शंका यावी असा राहिला नसल्याचे दिसू लागले आहे. त्यांचे अंतिम ध्येय राज्यातून आणि त्याही आधी मुंबई महापालिकेतून आपल्या जुन्या मित्राला हद्दपार करणे हा असणार याबाबत आता संदेह राहिलेला नाही. अर्थात हे उद्दिष्ट भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिळून पूर्ण करतील की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊन तीन विरुद्ध तीन अशा दोन महाआघाड्या रिंगणात उतरतील हे तूर्तास सांगता येणार नाही. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्याची सभा आणि त्याआधी विलेपार्ले येथे त्यांनी दिलेली जाहीर मुलाखत पाहता भाजपा मनसेला सोबत घेण्याच्या विचारात असावी हे स्पष्ट होते.
वास्तविक शिवसेना नाव आणि चिन्ह दोन्हींवर श्री. एकनाथ शिंदे यांनी कब्जा मिळवल्यामुळे भाजपला मनसेची गरज का लागावी हे कळत नाही. त्यामागे मुत्सद्दी राजकारण असणार आणि भाजपा एका दगडात अनेक पक्षी मारण्याच्या विचारात असावी असा अनुमान काढता येऊ शकेल.
श्री. एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी असलेले ५० आमदार आणि तितके मतदारसंघ त्यांच्या वाट्याला जागावाटपात जाणार यात वाद नाही. उर्वरित २३८ मतदार संघांपैकी भाजपा सर्व जागा लढवणे शक्य नाही. त्यांच्या कोट्यातील काही जागा ते मनसेला देऊ शकतात. शिंदे आणि त्यांच्या साथीदार आमदारांबद्दल जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये असलेल्या कथित नाराजीचा अंडरकरंट कमी करण्याचे काम राज यांच्याकडे सोपवण्यासाठी त्यांना सामावून घेण्याची धूर्त खेळी भाजपाने केली तर त्यात आश्चर्य वाटता कामा नये. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी राज यांचे साधर्म्य असण्याखेरीज ठाकरे नावाची पुण्याई मिळवणे हा हेतू असला तर तो स्वाभाविक म्हणावा लागेल. त्यालाच राजकीय शहाणपण म्हणतात. श्री. शिंदे यांचाही मनसेला सोबत घेण्यात आक्षेप नसणार. बेरजेच्या राजकारणातील हे साधे सोपे गणित लक्षात घेतले तर संभाव्य शिंदे-राज-भाजपा महाआघाडीचा आणखी एक पदर असाही असू शकतो की शिवसेनेच्या मतांची (अंडरकरंटवाली मते धरून) विभागणी न होता ती या महाघाडीलाच मिळावीत. श्री. शिंदे यांच्यासाठी आगामी काळात ही धोक्याची घंटा असेल काय असा प्रश्न मात्र काही जुन्या जाणत्या निरीक्षकांच्या मनात डोकावत असतो. अर्थात तो धोका आगामी निवडणुकीत नाही.
राज ठाकरे यांच्या मुलाखतीचा इथे संदर्भ देणे उचित ठरते. सभेतील भाषण म्हणजे भाजपाने दिलेली संहिता होती, असे बोलले जात असताना मुलाखतीत व्यक्त झालेले विचार कोणी लक्षात घेतलेले दिसत नाहीत. राज ठाकरे हे विलेपार्ल्यात एकदम पक्क्या अशा मध्यमवर्गासमोर बोलत होते म्हणून त्यांचे विचार या श्रोतृवर्गाला चुचकारणारे होते काय, अशी शंका येऊ शकते. परंतु आम्हाला तसे वाटत नाही. राज ठाकरे यांची भाषा, त्यांचे विचार हे मध्यमवर्गाचा दबलेला आवाज म्हणून प्रकट होत असतो. १९९५ पासून म्हणजे आर्थिक उदारीकरणानंतर मध्यमवर्ग राजकारणापासून दुरावत गेला आणि आता तर त्याने स्वतःला पूर्णपणे अलिप्त केले आहे, असे राज म्हणाले. नेत्यांवर अवलंबून रहाण्यात तथ्य नाही हे त्यांनी ओळखले.एकेकाळी आंदोलनांचे नेतृत्व करणारे नेते याच वर्गातून येत असत. गेल्या काही वर्षात ना अशी आंदोलने झाली की त्यांचे नेतृत्व तयार झाले. ते पुन्हा पुनर्जीवित व्हावे, अशी इच्छा व्यक्त करत राज यांनी मध्यमवर्गात जी काही थोडी धुगधुगी राहिली आहे, तिला प्रज्वलित करण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यमान नेत्यांबद्दल मध्यमवर्गाच्या मनात संतोष जरूर आहे, परंतु त्यांनी तो हतबलत्तून बाजूला सारत स्वतःला दूर ठेवणे पसंत केले. ही फारकत राज यांना सलत असेल तर सुचिन्ह मानावे लागेल.मध्यमवर्गीय पुढची पिढी परदेशात जाण्याची प्रक्रिया हा फारकतीचाच एक भाग म्हणावा लागेल. त्यांच्या मनात क्रोध धुमसत आहे. पण त्यांना आजच्या राजकारणाबद्दल फार आशा राहिलेली नाही. राज ठाकरे यांच्या मदतीने भाजपा या मध्यमवर्गाला आकर्षित करील ही एक धारणा आहे. दुसरे म्हणजे उर्वरित मध्यमवर्ग (जो या देशाच्या आता बाहेर जाऊ शकत नाही ) हिंदुत्ववादी आहे आणि त्याची कास धरून तो मतदार म्हणुन या नवीन आघाडीकडे वळवणे हा भाजपाचा विचार दिसतो. राज यांची भोंग्याबाबतची भूमिका असो की ताजे माहीम समुद्रातील दर्ग्याचे प्रकरण, ती भूमिका मध्यमवर्गाला सुखावून गेली हे नाकारता येणार नाही. सत्तेत असलेला शिंदे गट दोन धर्मांतील ध्रुवीकरणाचा उघडपणे लाभ घेऊ शकणार नाही. ते काम राज करत असतील तर त्ते त्यांच्या पथ्यावर पडणार आहे. राज यांची बार्गेनिंग पॉवर या प्रक्रियेत वाढत असेल तर मनसेच्या या स्थितीचा फायदा उठवल्याशिवाय राहणार नाही. दिल्लीमध्ये मध्यमवर्ग हा ‘आप’कडे होता. पुढे मोदी यांच्या करिष्म्यामुळे भाजपकडे गेला. दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातील मध्यमवर्गाला पुन्हा आपला मतदार करण्यासाठी हालचाली दिसू लागल्या आहेत. अर्थात त्यासाठी जे ‘आप’ने केले ते मनसेला करावे लागेल. ‘दिल्ली डायलॉग’ नामक कार्यक्रमांचा धडाका लावून अरविंद केजरीवाल यांनी व्यापक जनसंपर्क मोहीम राबवली. राज यांना त्यांच्या नेत्यांमार्फत असा उपक्रम राबवावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता, महाराष्ट्रातील जनतेची मानसिकता, शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेली संभ्रमावस्था आणि राज ठाकरे यांच्या हालचाली यावर महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्र अवलंबून असेल. या सर्व घडामोडीत अडगळीत पडलेल्या मध्यमवर्गाला आपले महत्त्व सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनीही उदासीनता आणि स्थितप्रज्ञता झटकून आपला आवाज आणि सहभाग कसा वाढेल यावर लक्ष द्यायला हवे.