साताऱ्यातील साहित्य संमेलनात अध्यक्ष विश्वास पाटील यांनी भाषणात वापरलेल्या विचारसंहिता शब्दाने आमचे लक्ष वेधून घेतले. सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे आणि आचारसंहिता हा शब्द वारंवार कानावर पडत आहे. निवडणुक लढवणाऱ्या प्रत्येकाला एका नियमावलीत बांधून त्यांच्या हातून सत्तेचा वा पदाचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी निवडणूक आयोगाची आचारसंहिता घेत असते. तिचे पालन आणि उल्लंघन सापेक्ष असते आणि त्याबद्दल सहसा राजकीय पक्ष एकमेकांना आव्हान देऊन निवडणूक प्रक्रियेतून बाद करण्याचा प्रयत्न करीत नाहीत. उभयपक्षी दोघेही किंवा सारेच आचारसंहिता धुडकावत असतात आणि त्यामुळे तिचे गांभीर्य कमी झाले आहे. अर्थात आज त्यावर लिहिण्याऐवजी ‘विचारसंहिते’वर मत मांडावे म्हणून हा प्रपंच. आचारसंहिता ही केवळ उमेदवारांना लागू होत असते तर विचारसंहिता ही त्यांच्याबरोबर मतदारांनाही लागू होते आणि तिचे उल्लंघन म्हणजे आपल्या मताशी प्रतारणा आणि लोकशाहीची फसवणूक करण्यासारखे ठरेल.
गेल्या काही वर्षांत मतदारांचा लोकप्रतिनिधी या संस्थेवरील विश्वास कमी-कमी होत चालला आहे. त्याचे प्रमुख कारण निवडून आलेले जनसेवक हे मुख्य उद्दिष्टापासून भरकटत जाणे. केवळ कर्तव्यपूर्तीपासून ते दूर होत नसून भलत्याच ‘कर्तव्यां’ मध्ये स्वत:ला वाहून घेताना दिसतात! अशावेळी मतदारांनी उमेदवारांच्या कार्यक्षमतेचा, त्याच्या सार्वजनिक जीवनातील प्रभावाचा, त्याच्या उपयुक्ततेचा, चारित्र्याचा आणि त्याच्या लोकहिताच्या संकल्पनांचा बारकाईने विचार करायला हवा. नगरसेवकांची भूमिका दोन स्तरांवर तपासली जायला हवी. एक-राजकीय आणि दुसरी-सामाजिक. राजकीयदृष्ट्या विचार करता सध्या एक मोठी समस्या आपण सारेच अनुभवत आहोत आणि ती म्हणजे निवडून आल्यावर पक्षांतर करण्याची. आपल्या उमेदवाराकडून प्रत्येक मतदाराने तो/ती पक्ष सोडणार नाही याची ग्वाही घ्यायला हवी. हे रोग पक्षांतर विरोधी कायद्यातील त्रुटींमुळे अशक्य असल्यामुळे नैतिक दबाव वाढवणे एवढेच मततदारांच्या हातात रहाते. हा विचार मतदान करताना व्हायला हवा. नगरसेवकांमध्ये स्वार्थाची भावना असते. परंतु त्या भावनेमुळे त्यांचे विहीत कर्तव्य पार पडण्यात अडचण येणार असेल तर त्याचाही विचार व्हायला हवा. आपण मतदान करुच नये असा अविचार करणे घातक ठरते. दगडापेक्षा वीट मऊ ह विचार मतदारांनी जरुर करावा. आपल्या मताने फरक पडत नाही हा दुसरा अविचारही मनातून काढावा. ते आपल्याला गृहीत धरतात हे तुणतुणे वाजवण्याऐवजी आपण हक्क बजावण्याचा विचार करायला हवा.
निवडणूक लढवणारे उमेदवार मग ते अपक्ष असोत की कोणा पक्षाचे, त्यांनी जनकल्याणाचा विचार केवळ जाहिरनाम्यांपुरता मर्यादित न ठेवता अंमलात आणण्याचा विचार करावा. उमेदवार कसा विचार करतो, तो किती खरा आहे आणि निवडून आल्यावर किती प्रामाणिक रहाणार आहे याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. अशी विचारसंहिता मतदारांच्या मनात आहे हा विचार राजकारण्यांपर्यंत पोहोचायला हवा. त्यासाठी प्रत्येकाने राजकारणातील उथळपणात रस घेण्यापेक्षा शहराच्या व्यापक हिताच्या तळापर्यंत कोण पोहोचतो याचा विचार केला तर कदाचित चांगल्या नगरसेवकांचे पीक हाती येईल. जिथे बिनविरोध नगरसेवक निवडून आलेले नाहीत, अशा प्रभागातील मतदारांना विचार करण्याची संधी आहे. अशा संधी भविष्यात कमी-कमी होत गेल्या तर आश्चर्य वाटू नये. त्यामुळे स्वघोषित विचार-संहितेची रुपरेषा बनवून तिचे काटेकोरपणे पालन करणे हे किमान आपण लोकशाही, महापालिका आणि नगरसेवक मंडळींना हलक्यात घेत नाही असा संदेश जाऊ शकेल. मतदारांनो, तुमची वेळ सुरु होत आहे, विचार करा, विचासंहिता बनवा!