‘नो पार्किंग’चा फलक नसताना दुचाकींची उचलबांगडी

ठाणे पूर्व स्टेशन लगतचा प्रकार

ठाणे : ठाणे पूर्व स्थानकाच्या फलाट क्र. १० ला अगदी खेटून असलेल्या पाय-यांजवळील पादचारी मार्गांवर ये-जा करणा-यांनी कोणतीही तक्रार केली नसताना आणि मुख्य रस्त्यापासून खूप आत मार्गावर लावलेल्या बोटावर मोजण्याइतक्या दुचाकींची ‘उचलबांगडी’ होत असल्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.

फलाट क्र. १० ला जवळ असलेल्या अगदी चिंचोळ्या गल्लीत ‘सॅटीस’च्या कामांसाठी मोठ्ठे खड्डे खोदले आहेत. हा चिंचोळा मार्ग फलाट क्र. १० ला जोडण्यात आल्यामुळे अनेक प्रवासी त्याचा दररोज वापर करत आहेत. सध्या ठाणे स्थानकाच्या पूर्व परिसरात लहान-मोठ्या खाजगी वाहनांना ‘नो पार्किंग’ आहे. त्यामुळे हजारो प्रवासी तिकीटघराकडे जाणा-या आणि फलाट क्र. १०कडे जाणा-या चिंचोळ्या मार्गातून, पायवाटेवरुन पहाटे ते रात्रीपर्यंत ये-जा करत आहेत.

चिंचोळया रस्त्यात काही दुचाकीस्वार त्यांची वाहने क्वचितच उ•ाी करताना आढळतात. कोपरी पूर्वेतील बुधवारी (९ आॅग.) वाहने उचलणा-या तिघांनी फलाट क्र. १० ला खेटून असलेली दुचाकी उचलली आणि ती थेट टोविंग वाहनावर चढवली. बाईक उचलणा-या कर्मचा-यांनी संबंधित ठिकाणी कोणतीही खूण न केल्याने दुचाकीस्वारांना त्यांची वाहने शोधणे कठीण झाले.

सध्या पूर्वेकडील फक्त रिक्षा चालकांनाच त्यांचे वाहन थांबवण्याची मुभा आहे. रिक्षांची ये-जा होत असल्यामुळे क्वचितच दुचाकीस्वार थांबतात, नाहीतर या रस्त्यावरुन जाण्याचे टाळतात.

‘सॅटीसची कामे केव्हा संपणार नाहीत, याची माहिती ना महापालिकेला… ना वाहतूक पोलिसांना, अशी अवस्था असल्यामुळे त्या परिसरात सर्व वाहनांसाठी ‘नो पार्किंग’चे मोठे फलक लावावेत आणि असेच फलक, फलाट क्रमांक १० कडे जाणाऱ्या चिंचोळ्या पायवाटेवर उभारावेत, अशी मागणी स्थानिक रहिवाशांची आहे.