वाहतुक शाखेकडे इच्छुक उमेदवाराने भरलला दीड लाखांचा दंड
ठाणे : निवडणूक लढताना उमेदवारांनी आपल्या वाहनांवरचा दंड भरून थकबाकी नसल्याबाबतचा दाखला घेणे आवश्यक आहे. अन्यथा, दंड थकीत असल्यास उमेदवारी अर्ज बाद ठरणार आहे. उमेदवारीवर संक्रांत येऊ नये म्हणुन आपल्या वाहनांवरील थकलेले ई चलन अदा करण्यासाठी उमेदवारांची धावाधाव सुरु झाली आहे. ठाण्यात एका इच्छुक उमेदवाराने चक्क दीड लाख रुपयांचा दंड भरून निवडणुकीचा मार्ग मोकळा केला आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर तसेच भिवंडी महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार पालिका निवडणुकांसाठी उमेदवार म्हणून अर्ज करताना, तुमच्यावर अनधिकृत बांधकामे केल्याचा अथवा शासन व प्राधिकरणांचे अन्य कर व दंड शुल्क थकीत नसल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्या अनुसार वाहनांवरील ई चलन दंड थकीत असु नये, असा नियम आहे. ई चलन दंड भरला आहे की नाही, हे निवडणुक अधिकारी तपासणार आहेत. या संदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) नसल्यास उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे पेंडिंग ई चलन भरण्यासाठी ठाणे वाहतूक विभागात गर्दी होऊ लागली आहे. एका इच्छुकाने तर मंगळवारी आपल्या वाहनावरील तब्बल दीड लाख ई चलान दंड भरून आपली उमेदवारी सुरक्षित केली आहे.