संयम संपला, रणरागिणीने फोडल्या फेरीवाल्यांच्या गाड्या!

खारीगावमध्ये भररस्त्यात दिसले चित्रपटाला शोभेल असे दृश्य

ठाणे : एखाद्या हिंदी चित्रपटाला शोभेल असे दृश्य खारीगाव येथे भर रस्त्यावर शेकडो नागरिकांनी पाहिले. ही संपूर्ण ॲक्शन लोकांच्या लक्षात येण्याआधीच सहनशक्ती संपलेल्या महिलेने रस्ते अडवलेल्या फेरीवाल्यांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या. कोणत्याही पक्षाचा झेंडा वा पाठिंबा नसलेल्या या महिलेने खळ्ळखट्याकचे प्रात्यक्षिकच दाखवले.

कळवा भागातील पारसिक नगरमधील रस्ते अडवून बसलेल्या फेरीवाल्यांच्या विरोधात महापालिका कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याने त्रस्त झालेल्या एका महिलेने रण रागिणीचे रूप धारण करून फेरीवाल्यांच्या गाड्यांची तोडफोड करून आपला राग व्यक्त केला. खारीगाव भागातील पारसिक नगर येथे मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती झाली आहे. रस्ते देखिल प्रशस्त झाले आहेत, परंतु या रस्त्याचा ताबा भेळपुरी, पाणीपुरी, मोमोज, चायनीज आदी खाद्यपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यानी घेतला आहे. या रस्त्यावर चालणे या भागातील नागरिकांना मुश्किल झाले आहे. महापालिका अधिकारी कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाहीत. तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने या भागात दिवसेंदिवस फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे. दरदिवशी रस्त्यावर चालणे मुश्किल झाल्याने आज सायंकाळी ७. ३०च्या दरम्यान या भागातील एका महिलेने थेट रस्त्यावर उभ्या असलेल्या हातगाडी वाल्यांच्या विरोधात दंड थोपटून हातगाड्यांची तोडफोड केली, त्यामुळे फेरीवाल्यांची पळापळ झाली. ही महिला कोण आहे याची कल्पना फेरीवाल्यांना येण्यापुर्वीच त्या महिलेने पाणीपुरी, भेळपुरी, मोमोजसह सहा ते सात फेरीवाल्यांच्या गाड्यांची तोडफोड करून रस्त्यावर धंदा करण्यास मज्जाव केला.

या महिलेने केलेल्या तोडफोडीचे या भागातील नागरिकांनी समर्थन केले आहे. चांगले रस्ते फेरीवाल्यांमुळे अडथळ्याचे झाले आहेत. महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी हप्ते घेऊन त्यांना संरक्षण देत आहेत, त्यामुळे या महिलेने योग्य तेच केले, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली आहे.

हफ्तेबाजीमुळे फेरीवाले वाढले

या भागात दिवसेंदिवस फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे. लोकांना चालण्यासही पुरेशी जागा मिळत नाही. या फेरीवाल्यांकडून दररोज हजारो रुपयांचे हप्ते गोळा केले जातात. अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही त्यावर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप येथील माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी केला आहे.