महसूल परीक्षेत पास; २०० कोटी बोनस गुण!

* ठामपाच्या तिजोरीत १९०९ कोटी जमा
* २०२४-२५ मध्ये १७१४ कोटी संकलित

ठाणे : ठाणे महानगरपालिकेने मागिल वर्षाच्या तुलनेत तब्बल दोनशे कोटींचे जास्त उत्पन्न मिळवून ‘महसूल परीक्षा’ यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे. विविध कर आणि शुल्कांमधून तब्बल १९०९ कोटी रुपये महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा झाले असून, निर्धारित १९०० कोटींच्या उद्दिष्टालाही मागे टाकण्यात ठामपाला यश आले आहे.

महापालिकेच्या विविध विभागांकडून करण्यात आलेल्या वसुलीत मालमत्ता कर विभागाचा सिंहाचा वाटा असून, त्यातून सुमारे ८७८ कोटी रुपये जमा झाले आहेत. याशिवाय शहर विकास विभागाच्या वसुलीतून ६६२ कोटी, तर इतर कर व शुल्कांमधून अनुक्रमे १४० कोटी, ६० कोटी, ३६ कोटी आणि १७ कोटी इतकी रक्कम जमा झाली आहे. तसेच इतर लहान-मोठ्या माध्यमांतूनही १५१ कोटी महसूल मिळून एकूण आकडा १९०९ कोटींवर पोहोचला आहे. मागिल वर्षी मालमत्ता कर विभागाने ७२४, शहर विकास विभागाने ५८५, पाणी पुरवठा विभागाने १४८कोटी आणि इतर मिळून १७१४. ७८ कोटी इतके उत्पन्न मिळाले होते. हे उत्पन्न या वर्षाच्या तुलनेत १९४ कोटींनी कमी आहे.

महापालिका आयुक्त सौरभ राव आणि महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी यांनी आर्थिक शिस्त राखत विविध करांची काटेकोर अंमलबजावणी, थकबाकीदारांवर कारवाई आणि वसुली मोहिमा राबवल्यामुळे ही कामगिरी साध्य झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विशेषतः मालमत्ता कर वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमांमुळे मोठ्या प्रमाणात थकबाकी वसूल करण्यात यश आले.

दरम्यान, ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल जमा झाल्यामुळे आगामी विकासकामांना चालना मिळणार असून, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते व इतर नागरी सेवांवर अधिक निधी खर्च करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महानगरपालिकेची ही कामगिरी आर्थिक नियोजन आणि अंमलबजावणीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात असून, पुढील वर्षासाठीही अधिक उंच उद्दिष्ट ठेवण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.