नवी मुंबईतून २५ डिसेंबरला विमानाचे पहिले उड्डाण
नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झालेल्या नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 25 डिसेंबर रोजी पहिले प्रवासी विमान उडणार आहे. या दृष्टीने विमानतळ प्रशासनाने 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी पहिली प्रवासी चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.
शेकडो स्वयंसेवकांना प्रवासी बनवून पूर्ण प्रक्रियेचे सिम्युलेशन करण्यात आले. यात चेक-इन, सुरक्षा तपासणी, बोर्डिंग प्रक्रिया आणि बॅगेज क्लेमपर्यंत सर्व टप्प्यांची काटेकोर तपासणी करण्यात आली. इंडिगो, अकासा आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या विमान कंपन्यांनी या ट्रायलमध्ये सहभाग घेतला होता. 19,650 कोटी रुपयांच्या खर्चाने विकसित करण्यात आलेलं हे देशातील सर्वात मोठं ग्रीनफिल्ड विमानतळ ठरणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाढत्या प्रवासी गर्दीचा भार कमी करण्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे, आता 25 डिसेंबर रोजी येथून पहिलं विमान कोणत्या शहरासाठी, देशासाठी उड्डाण करतं आणि त्यातील प्रवासी कोण राहतील, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
नवी मुंबईतून पहिल्या उड्डाणासाठीचे बुकींग यापूर्वीच सुरू झाले असून इंडिगोचे भाडे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा अधिक, तर अकासा एअरचे भाडे त्याउलट कमी असल्याचं समोर आलं होतं. अकासा एअरनंतर इंडिगोकडूनही नवी मुंबईवरुन उड्डाणांची नोंदणी सुरू केल्याची माहिती आहे. इंडिगोकडून नवी मुंबईवरून 10 भारतीय शहरांसाठी उड्डाणांची सुविधा उपलब्ध तर अकासाकडून दिल्ली, कोच्ची, गोवा आणि अहमदाबादसाठी सेवा नियमितसुरू राहणार आहे. या विमानतळाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर रोजी झाले होते. उद्घाटनानंतर केवळ दोन महिन्यांत विमानतळ पूर्ण क्षमतेने उड्डाण सेवेसाठी सज्ज झाले आहे.
नवी मुंबईवरुन दिल्लीसाठी
इंडिगो-६२७४ रुपये, अकासा-५७७६ रुपये, नागपूरसाठी इंडिगो-७२६७ रुपये, कोच्चीसाठी-इंडिगो- ९११६ रुपये, अकासा-७३७३ रुपये
मुंबई विमानतळावरुन दिल्लीसाठी इंडिगो-६११६ रुपये, अकासा-५७७६ रुपये, नागपूरसाठी इंडिगो-५७४४ रुपये, कोच्चीसाठी इंडिगो-१५,४३४ रुपये, अकासा-२४,१६० रुपये