क्षेपणभूमी परिसरात खतनिर्मिती, सुगंधित वातावरण आणि ऑक्सिजन निर्मिती
आनंद कांबळे/ठाणे
ठाणे शहरातील आतकोली येथे टाकण्यात आलेल्या सुमारे ४०फूट उंचीच्या उभ्या राहिलेल्या कचऱ्याच्या डोंगरावर ठाणे महापालिकेच्या उद्यान विभागाने नंदनवन फुलवले आहे. त्यामुळे या भागात दुर्गंधीने हात नाकावर जाण्याऐवजी सुगंधाने मन प्रफुल्लीत होणार आहे.
आतकोली येथे अवघ्या आठ महिन्यांत उभ्या राहिलेल्या ४० फूट कचऱ्याच्या डोंगराचे सपाटीकरण करून ठाणे महापालिकेने त्यावर लॉन उभारले आहे. चहूबाजूने हिरवळ, शेकडो कडूलिंबाची रोपे आणि बांबूच्या वनाच्या संरक्षक भिंतीमुळे भिवंडीच्या आतकोलीला उद्यानाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
दिवा येथील डम्पिंग ग्राउंड बंद झाल्यानंतर राज्य शासनाने ठाण्यातील कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठाणे महापालिकेला भिवंडीच्या आतकोली येथे ३४ हेक्टर इतका भुखंड दिला आहे. ठाणे शहरात रोज जमा होणारा सुमारे एक हजार टन कचरा या क्षेपणभुमीवर गेल्या आठ महिन्यांपासून टाकला जात आहे. या कालावधीमध्ये १० गुंठे भुखंडावर तब्बल ४० फुटांचा कचर्याचा डोंगर उभा राहिला. सुमारे ६० हजार टन इतक्या कचर्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरू लागली. त्यामुळे येथील गावकर्यांचा विरोधही वाढला. अखेर यावर महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाचे उपायुक्त मधुकर बोडके यांनी पर्यावरणपुरक तोडगा काढला आहे. गौण खनिजाचे उत्खनन झाल्यामुळे ओसाड झालेल्या या भुखंडावर कचर्यातून हिरवाई फुलवण्याचा ध्यास पालिकेच्या उद्यान विभाग आणि घनकचरा विभागाने घेतला आहे. पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील १० गुंठे भुखंडावर प्रायोगिक तत्वावर ही संकल्पना राबवण्यात येत आहे.
येथे टाकलेल्या कचर्यावर सर्वप्रथम लाल मातीचा थर देण्यात आला आहे. दुर्गंधीनाशक तसेच जंतूनाशक रसायनाची फवारणी करत माती व कचर्याचे मिश्रण करून मग त्यावर हिरवळ तयार करण्यात आली आहे. अशा पद्धतीने तयार झालेल्या लॉनमुळे या परिसराचे रुपडे पालटले आहे.
विशेष म्हणजे कचर्याचे रुपांतर खतमिश्रीत मातीत होईल अशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्यामुळे कचर्याचे पर्यावरणपुरक विघटन होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
हा प्रयोग यशस्वी झाला तर प्रत्येकी १० गुंठे प्रमाणे ३६० लॉन तयार करणे शक्य होणार आहे. याशिवाय या परिसरात ११० कडूलिंबाची रोपटे लावण्यात आहेत.
या भुखंडावर असलेल्या जुन्या झाडांचे सवंर्धन केले जात आहे. याशिवाय कडूलिंबाची रोपे लावण्यात येत आहेत. तसेच बांबूच्या बनाची संरक्षक भिंतही उभारण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात क्षेपणभुमी परिसराला भरपूर ऑक्सीजन मिळणार आहे.
आतकोली भुखंडावर उच्च दाबाचे विद्युत पोल आहेत. या पोलची रचना पिरामिडसारखी करण्याची योजना आहे. तसेच त्याभोवती सुगंधी फुलांचे रोपटे लावण्यात येणार आहेत. देशभरातील सर्व जातीच्या सुगंधी फुलांचे रोपे येथे लावून उद्यान तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे कचर्याची दुर्गंधी कमी होण्यास मदत होणार आहे.