पुण्यातील परेडनंतर शांतताप्रिय ठाणेकरांच्या आशा पल्लवित
ठाणे : पुणे शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सुमारे ३०० नामचीन गुंडांची परेड घेत कडक शब्दात समज दिली. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गतही गुंडांची परेड घेतली जाईल, अशी शक्यता शांतताप्रिय ठाणेकरांमध्ये व्यक्त होत आहे.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांची झाडाझडती घेण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले. मंगळवारी पोलीस आयुक्तालयात गुंड गजानन मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ, सचिन पोटे यांच्यासह ३०० गुंडांची चौकशी करून त्यांना समज देण्यात आली. आगामी निवडणुका शांततेत आणि सुरळीत व्हाव्यात तसेच आयुक्तालयात शांतता सुव्यवस्था राहावी यासाठी त्यांची परेड घेण्यात आली. वृत्त वाहिन्यांवर या परेडची दृश्ये पाहून असा निर्णय राज्यातील सर्वच पोलीस आयुक्तांनी घ्यायला हवा, अशी जोरदार चर्चा सुरू झाली.
मागील काही महिन्यांत ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत अनेक गंभीर गुन्हे घडल्याने ही चर्चा ठाण्यातही जोर धरू लागली आहे. उल्हासनगरमध्ये नुकत्याच झालेल्या गोळीबाराच्या घटनेने अवघ्या जिल्ह्यातच खळबबळ उडाली होती. त्यामुळे जिल्ह्यात आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली. भर रस्त्यात तलवारी नाचवणे, मिरवणुका काढणे, वाढदिवस साजरे करून त्याचे चित्रण व्हायरल करणे, नेत्यांचे फोटो डीपीवर ठेवणे, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे गुन्हेगारीत सहभाग घेणे, महापालिका अधिकाऱ्यांवर दडपण आणणे, अशी कृत्ये सहसा आढळून येतात. त्यामुळे जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असते. त्याच बरोबर लवकरच लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा आणि महापालिका निवडणुका एका मागोमाग येत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची परेड घेतली जाईल, अशी चर्चा ठाण्यात सुरू झाली आहे.
ठाण्याचे नवीन पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी या आधी ठाण्यात काम केले असल्याने त्यांना येथील माहिती आहे. त्यांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेला चालना दिली असून गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांनी सुत्रे स्वीकारल्यानंतर भूमिका स्पष्ट केली आहे. यासाठी नागरिकांच्या सूचनाही त्यांना अपेक्षित असून नागरिकही स्पष्टपणे भूमिका मांडताना दिसत आहेत. त्यामुळे ठाण्यातही आयुक्तांनी गुंडांची परेड घेतली तर नवल वाटणार नाही.