धुराचे लोट पसरताच रेल्वे प्रवाशांमध्ये घबराट

ठाणे-कळवा दरम्यान रुळाखाली नाल्यात कचऱ्याने घेतला पेट

ठाणे: ठाणे-कळवा रेल्वे मार्गावर संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी अचानक आगीचा धूर पसरल्याने मध्य रेल्वेवर भीतीचे वातावरण निर्माण होऊन प्रवाशांची धावपळ झाली. त्यामुळे २० मिनिटे लोकल उशिरा धावल्या.

आज संध्याकाळी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर एक थरारक प्रसंग घडला. नेहमी गजबजलेल्या कळवा आणि ठाणे रेल्वे स्थानकांदरम्यान रुळाखालील एका नाल्यात कचरा पेटला. या आगीमुळे आकाशात धुराचे मोठे लोट दिसू लागले. काही वेळातच संपूर्ण परिसर धुराने भरून गेला.यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. संध्याकाळची वेळ असल्याने लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होती. अशावेळी हा प्रकार घडल्याने हजारो प्रवाशांची एकच धावपळ उडाली.

या आगीमुळे कळव्यातून ठाण्याकडे जाणाऱ्या आणि ठाण्याहून कल्याण-डोंबिवलीकडे जाणाऱ्या लोकल गाड्या सुमारे १५ ते २० मिनिटे उशिराने धावल्या. मात्र, रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने आग आटोक्यात आणली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.