गटार तुंबल्याने राबोडीत रस्त्यावर घाणीचे साम्राज्य

ॲड. जावेद शेख यांचा महापालिकेला तीव्र आंदोलनाचा इशारा
​ठाणे: ठाण्यातील राबोडी परिसरातील रवी मंझिलच्या मागील बाजूस आणि अक्सा बिल्डिंगच्या समोर गेल्या काही दिवसांपासून मुख्य ड्रेनेज लाईन पूर्णपणे तुंबली आहे. यामुळे गटाराचे मैलायुक्त पाणी थेट मुख्य रस्त्यावर साचले असून परिसराला गलिच्छ स्वरूप प्राप्त झाले आहे.
रस्त्यावर पसरलेल्या या तुंबलेल्या पाण्याच्या अथांग साठ्याला स्थानिक नागरिकांनी संतप्त होऊन ‘राबोडीचा काळा समुद्र’ असे नाव देऊन महापालिकेच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले आहेत. ​विशेष म्हणजे, हे तुंबलेले गटार स्थानिक नगरसेवकाच्या कार्यालयापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर असूनही याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन पूर्णपणे डोळेझाक करत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
​रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात उग्र व असह्य दुर्गंधी पसरली आहे. साचलेल्या पाण्यात डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर झाल्याने स्थानिकांची रात्रीची झोप उडाली आहे. परिसरात मलेरिया आणि इतर साथीच्या आजारांचे रुग्ण वाढू लागले असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एवढे होऊनही ठाणे महापालिकेचा आरोग्य व स्वच्छता विभाग अद्याप निद्रिस्त अवस्थेत आहे.
​या गंभीर समस्येबाबत ठाणे महानगरपालिका आयुक्त आणि उथळसर प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.​पुढील ४८ तासांच्या आत महापालिकेने हे तुंबलेले गटार तत्काळ साफ करून पाणी उपसले नाही, तर ठाणे काँग्रेसतर्फे महापालिकेविरोधात रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ठाणे काँग्रेसचे नेते ॲड. जावेद शेख यांनी महापालिका प्रशासनाला  दिला आहे.
अक्सा बिल्डिंग व रवी मंझिल परिसरातील गटार तातडीने मोकळे करून औषध फवारणी व धूर फवारणी त्वरित करण्यात यावी तसेच ​ड्रेनेज लाईनची कायमस्वरूपी दुरुस्ती करून नागरिकांना या नरकयातनेतून मुक्त करावे, अशा मागण्या आयुक्तांना दिलेल्या पत्रात करण्यात आल्या आहेत.