सामान्य प्रशासन विभागाचा सावळा गोंधळ
कल्याण: गुरुवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने काढलेल्या बदली आदेशात चतुर्थ श्रेणीतील १३२ कर्मचाऱ्यांच्या यादीत चक्क मयत व सेवानिवृत्त झालेल्या कामगारांची नावे समाविष्ट असल्याचे आढळून आल्याने पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील सावळा गोंधळ उजेडात आला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महत्वाच्या विभागात वर्षानुवर्षे तेच तेच अधिकारी-कामगार ठाण मांडून बसले आहेत. त्यांचे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी लागेबांधे असल्याने त्यांची बदली अन्य विभागात होत नसल्याने त्या-त्या विभागात त्यांची मक्तेदारी बनली असल्याने त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नाही. एकाच जागेवर वर्षानूवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदलीच्या कारवाईकरीता सामान्य नागरीक आणि लोकप्रतिनिधींकडून अनेक वेळा तक्रारी केल्या जातात. मात्र पालिका प्रशासनाकडून या तक्रारींची प्रत्यक्षात दखल घेतली जात नाही.
महापालिकेच्या अतिक्रमण आणि फेरीवाला हटाव पथकात गेली १० ते १५ वर्षे काही कामगार कार्यरत असून त्यांची प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यापेक्षा चांगलीच पकड या विभागात असल्याने तेच या विभागाला चालवत असल्याच्या तोऱ्यात असतात. एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेत त्यांनी फेरीवाला हटाव आणि अतिक्रमण विभागातील १३२ कामगारांच्या बदल्या केल्या. बदली करण्यात आलेल्या कामगारांच्या यादीत मृत आणि सेवा निवृत्त कामगारांच्या नावांचा समावेश आहे. तसेच कंत्राटदाराकडे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांच्या नावाचाही समावेश आहे.
महापालिकेच्या सामान्य प्रशासनाकडे मृत, सेवानिवृत्त आणि कार्यरत असलेल्या कामगारांची माहिती असते. सामान्य प्रशासनाकडून जी यादी आयुक्तांना सादर केली गेली त्यानुसार त्यांनी त्या यादीवर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आयुक्तांना चुकीची यादी देणाऱ्या सामान्य प्रशासनातील अधिकाऱ्यावर आयुक्त कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आयुक्तांनी फेरीवाला आणि अतिक्रमण पथकातील कामगारांची बदली केली. त्याचप्रमाणे नगररचना विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांविरोधातील तक्रारीची दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.