टीएमटीच्या अवघ्या ७० बस; खर्च मात्र कोट्यवधींचा !

ठाणे : ठाणे परिवहनच्या मालकीच्या अवघ्या ७० बस उरल्या असताना त्यांच्या सुट्या भागावरील खरेदीसाठी मात्र करोडो रुपये खर्च केले जात असून मागील २५ ते ३० वर्ष तेच ठेकेदार सुटे भाग पुरवण्याचे काम करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
परिवहन सेवेची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक झाली आहे, त्यामुळे परिवहन सेवेचा भार खासगी ठेकेदारावर टाकला जात आहे. परिवहन सेवेकडे कधीकाळी ३०० ते ३५० बस होत्या. सध्या परिवहनच्या कळवा आगारात २२, वागळे येथे ३५ आणि मुल्ला बाग येथे अवघ्या १० बस आहेत. या बस नादुरुस्त झाल्या तर त्यांच्या दुरुस्तीकरीता जे सुटे भाग पुरवले जातात त्याचे ठेकेदार वर्षानूवर्ष तेच आहेत. टायर दुरुस्ती करणारे अनेक वर्षे ठेका घेत आहेत. इंजिन ऑइलवालेही जुनेच आहेत. गणवेश पुरवठादार तोच आहे. तिकीट पंचिंग देणारे तेच आहेत, त्यामुळे परिवहन सेवेला चांगल्या दर्जाचे सुटे भाग मिळत नाहीत, अशी शंका व्यक्त केली जात आहे. किती पुरवठा झाला, कशा दर्जाचे सुटे भाग पुरवले हे तपासण्यासाठी परिवहन सेवेकडे क्वालिटी कन्ट्रोल विभाग अस्तित्वात नसल्याची बाब समोर आली आहे, त्यामुळे परिवहन सेवेकडे बनावट सुटे भाग पुरवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सेवेकडे अवघ्या ७० बस असताना त्यांच्या दुरुस्तीकरिता करोडो रुपयांचा खर्च कसा झाला, पुरवठा करण्यात आलेल्या सुट्या भागाची तपासणी अधिकाऱ्यांनी केली होती का, असे प्रश्न ठाणेकर विचारत आहेत. सुटे भाग व इतर साहित्य पुरवणाऱ्या ठेकेदारांची मक्तेदारी आयुक्त अभिजित बांगर यांनी मोडून काढण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.
कोरोना काळात परिवहन सेवेतील ५६ चालक/वाहक ठाणे महापालिकेच्या सेवेत तात्पुरते दाखल झाले होते, ते अजूनही तेथेच असून परिवहन सेवेत चालक/वाहक कमी असून ठाणे महापालिकेकडे असलेल्या कर्मचाऱ्यांना परत पाठविण्याची मागणी केली जात आहे.