नवी मुंबई : २१ व्या शतकातील आधुनिक शहर बनत चाललेल्या नवी मुंबई शहरात काळाच्या ओघात सर्वच सणांचे रुप पालटत असले तरी येथील अनेक गावांमध्ये सण, उत्सवाची परंपरा पुर्वीप्रमाणेच जोपासली जात आहे. शहरी भागात गल्ली, बोळात होळ्या पेटविल्या जात असल्या तरी येथील गावा गावात असलेली ‘एक गाव, एक होळी’ची परंपरा आजही कायम ठेवण्यात आली आहे.
२१ व्या शतकातील आधुनिक शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबई शहरात येथील स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्या सणांची परंपरा आणि संस्कृती कायम राखत गावागावात पारंपरिक पद्धतीने आणि मोठया भक्ती भावात होळीचा सण साजरा करण्यात आला. नवी मुंबईतील दिवाळे गाव ते ऐरोली गाव अशा सर्व गावात होळी सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ज्याप्रमाणे कोकणात शिमगोत्सव साजरा केला जातो अगदी त्याच जोशात नवी मुंबईतही होळी साजरी केली जाते. होळीची चाहुल ही होळीच्या नऊ दिवस अगोदर सुरू होते. काही गावात होळीचा सण येत आहे म्हणून नऊ दिवस अगोदरपासून शेकोटी (हाऊल कुकुर) पेटवली जाते. होळीच्या दिवशी दुपारी होळी लावण्याच्या जागेचे पूजन केले जाते आणि होळी उभी केली जाते. होळीला पुरण पोळी करंज्या, साखर हलवा आणि विशेष करून तांदळाच्या पापडी, पुरण पोळीचे नैवेद्य दाखवले जाते. सायंकाळी गावातील सुवासिनी होळीची विधिवत पूजा करतात. त्यानंतर रात्री गावांच्या मानकऱ्यांच्या हस्ते होळीला अग्नी दिली जाते. व पेटत्या होळीसमोर ज्येष्ठ महिला समोरा समोर गाणी म्हणतात.
जावयांना विशेष मान
आगरी कोळी समाजात होळीला जावयाला विशेष मान दिला जातो. होळीच्या आधी ज्याचे लग्न झाले आहे, अशा जावयांना सासरी आमंत्रित केले जाते. या दिवशी जावयाला गोडधोड जेवण, तसेच भेटवस्तू दिली जाते. होळी पेटल्यावर जावई होळीला नारळ अर्पण करतात. तर कोपरखैरणे गावात ग्रामस्थ मंडळातर्फे या जावयांचा विशेष सत्कार केला जातो.
नवरा-नवरीचे सोंग
होळीनिमित्त कोकणात ज्या प्रकारे नानाविध सोंगे केली जातात, त्याचप्रकारे नवी मुंबईत नवरा-नवरीचे सोंग केले जाते. यात लहान मुलांची प्रतिकात्मक वरात काढून ती गावभर फिरवली जाते. सर्व ग्रामस्थ वऱ्हाडी बनून नाचत असतात.
शिरवणे गावात महिलांनी पेटवली होळी
नवी मुंबईत गावागावात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ही होळी पेटवण्याचा मान येथील पाटील किंवा पारंपरिक असलेल्या कुटुंबांनाच असतो आणि शक्यतो पुरुषांना मान मिळतो. मात्र शिरवणे येथे या परंपरेला छेद देत होळी पेटवण्याचा मान महिलांना देत महिला दिन पूर्व महिलांचा सन्मान करण्यात आला आहे. माजी नगरसेविका माधुरी सुतार यांच्या हस्ते ही होळी पेटवण्यात आली.