नवी मुंबई : शाळकरी मुलांमध्ये सध्या भाईगिरीचे फॅड वाढत असून शाळांच्या आवारात अल्पवयीन मुलांकडून मारहाणीचे प्रकार घडत आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा तुर्भे गावात दिसून आला आहे. या ठिकाणी झालेल्या मारामारीत एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे.
तुर्भे गावातील सामंत विद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये बुधवारी दुपारच्या वेळेत शाळेच्या वेळेत वाद झाला. हा वाद काही वेळापुरता शमवण्यात आला होता. मात्र शाळा सुटल्यावर नजीकच्या मैदानात हा वाद पुन्हा उफाळून आल्याने आपापसात जोरदार भांडण झाली. ही भांडणे एवढी भीषण होती की त्यात एका १६ वर्षीय विद्यार्थ्यांचा जीव गेला असून एक विद्यार्थी जखमी झाला आहे. जखमीवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एपीएमसी पोलीस व गुन्हे शाखा कक्ष १ ने घटनास्थळी धाव घेतली असून पाच ते सहा विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सदर घटनेचा तपास हा एपीएमसी पोलीस ठाणे व गुन्हे शाखा कक्ष एक समांतर रित्या करत आहेत.नवी मुंबईत शाळांच्या आवारात अल्पवयीन मुलांकडून मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली असून मागील महिन्यात देखील वाशीत असाच एक प्रकार घडला होता. यावेळी पालकांनी त्या मुलाची समजूत काढून प्रकरण शांत केले होते. याबाबत यापूर्वी ‘ठाणेवैभव’ वृत्त प्रकाशित झाले होते. अशा घटना वारंवार घडत असल्याने शाळा सुटताना पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी पालकांनी केली होती.
———————————-
तुर्भे गावात झालेल्या मारहाणीत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून काही विद्यार्थ्यांना तपासासाठि बोलावले आहे.या याबाबत अधिक तपास केल्यानंतर नमेक कारण समजू शकेल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी दिली.