अंबरनाथ, बदलापूरमध्ये मतदार यादी पुनर्निरिक्षणात अडथळे

बदलापूर: राज्यभर सुरु असलेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनर्निरिक्षणाच्या कामात अंबरनाथ आणि बदलापुरात सहकार्य करण्यात अडथळे येत असल्याचे आढळून आले आहे. नेमलेल्या विविध ठिकाणी बीएलओ कर्तव्यावर हजर राहत नसल्याचे तसेच कामाचे आदेश स्विकारत नसल्याचे दिसून आले आहे.

लोकप्रतिनिधींनी याकामी पुढाकार घेऊन नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम सुरू केले असले तरी त्यांना सहकार्य मिळत नसल्याने मतदान मॅपिंगच्या कामात अडचणींचा अडथळा असल्याचे निदर्शनाला आले आहे.

मतदार याद्यांच्या पुनर्निरिक्षणाच्या कामात बीएलओ महत्वाचे आहेत. तसेच शिक्षकांना देखील याची जबाबदारी देण्यात आली आहे. या कार्यक्रमाची सुरूवात झाली असली तरी शहरी भागात पुनर्निरिक्षण काम संथगतीने सुरू असल्याची बाब समोर आली आहे.

बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी मारूती गायकवाड यांनी शहरातील सहा शिक्षकांना निवडणुकीसारख्या महत्वाच्या कामामध्ये हलगर्जीपणा आणि टाळाटाळ दाखविण्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश पर्यवेक्षक यांना दिले आहेत.

दरम्यान, या कामात ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील मतदारांमध्ये निरूत्साह दिसून येतो आहे. अनेक मतदार सुट्ट्यांनिमित्त गावी निघाले आहेत. काही ठिकाणी परिक्षा असल्याने पालक त्यात व्यस्त आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी मतदारांना देखील सहकार्याची विनंती करावी लागत आहे. त्यामुळे याचा फटका मतदार याद्यांना बसेल अशी भीती लोकप्रतिनिधींना वाटत आहे.

अंबरनाथ विधानसभेसाठी ३३९ बीएलओंची नियुक्ती करण्यात आली आहे. यात २२८ अंबरनाथचे तर उर्वरीत १११ उल्हासनगर हद्दीतील आहेत. जवळपास ४० बीएलओ कमी अधिक प्रमाणात काम सुरू करून त्यानंतर अनुपस्थित आहेत. त्यामुळे अशा बीएलओंना पहिल्यांदा समज देवून त्यानंतरही कामात गैरहजर राहिल्यास त्यांना नोटीस बजावली जाऊन कारवाई केली जाणार आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांना सहकार्य केले जाते पण बीएलओ अनेकदा उपस्थित नसतात. पुनर्निरिक्षण प्रक्रिया किचकट आणि तांत्रिक आहे. नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने मुदतीत संबंधित प्रक्रिया पूर्ण होईल का याबाबत शंका वाटत असल्याचे बदलापूरचे नगरसेवक श्रीधर पाटील यांनी सांगितले.

सहकार्य करत नाही अशा बीएलओ यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी पर्यवेक्षकांना सूचना दिल्या आहेत. बहुतांश ठिकाणी सुरळीत काम सुरू झाले आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघात सुरळीतपणे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत यात मोठा टप्पा पूर्ण झालेला असेल, असा विश्वास सहायक मतदार नोंदणी अधिकारी नगरपालिका मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी व्यक्त केला.