आता शिळफाटा रस्त्यावर मेट्रोने प्रवास

* मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा
* खासदार श्रीकांत शिंदेंच्या प्रयत्नांना यश
* शिळफाटामार्गे तळोजा मेट्रो, काटई, देसाई नाका, कल्याणफाटा, दहीसर मोरी मेट्रोमार्ग

कल्याणः कल्याण-डोंबिवली शहराला थेट तळोजामार्गे नवी मुंबईशी जोडणाऱ्या मेट्रो १२ या मार्गाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. त्यासाठी मेट्रो १२ अ हा प्रकल्प आता राबवला जाणार असून कल्याण-शीळफाटा रस्त्याला समांतर मेट्रो मार्गाची उभारणी केली जाणार आहे.

कल्याण फाट्यावरून मेट्रो १२ अ ही दहीसर-मोरीमार्गे तळोजा मेट्रो स्थानकापर्यंत जाईल. यामुळे कल्याण शीळफाटा रस्त्यावरील वाहनांचा भारही कमी होणार आहे. या प्रकल्पासाठी ८४१४.५३ कोटींच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासह कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी घेतला.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नुकताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) २०२६-२७ वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध प्रकल्पांसाठी ४८९७.१९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा शुक्रवारी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतला. यावेळी त्यांनी पलावा उड्डाणपूल, मेट्रो १२, तिसरा पत्री पूल, वालधुनी नदी लगत विठ्ठलवाडी स्थानक ते कल्याण अहिल्यानगर महामार्गापर्यंतचा उन्नत मार्ग आणि कल्याण रिंग रोड या प्रकल्पांची त्यांनी पाहणी केली. यावेळी प्रकल्पाला गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करून तो नागरिकांसाठी खुला करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना त्यांनी कल्याण ते तळोजा मेट्रो १२ मार्गाच्या विस्तारीकरणाची घोषणा केली. कल्याण ते तळोजा या मेट्रो १२ मार्गाच्या विस्तारीकरणाचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. या त्यामुळे मेट्रो १२ हा मार्ग दोन भागातून जाणार आहे. नव्या विस्तारीत मार्गामध्ये कल्याण शीळफाटा रस्त्याच्या समांतर मार्गिका नेण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विस्तारीत डोंबिवलीसह, मानपाडा, कटाई नाका, ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडलेगाव, कल्याण फाटा, गोठेघर, दहिसार मोरी, दहिसारगाव, किरावली गाव, रोहिंजण, खुतारी गाव या भागातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. या नव्या मार्गामुळे शिळफाटा रस्त्यावरील वाहनांची संख्याही कमी होईल.

कळवा, दिवा, मुंब्रा भागात जाणारी ही पहिली मेट्रो ठरणार असून भविष्यात मेट्रो १४ सोबत इंटीग्रेशन झाल्याने त्याचा फायदा थेट नवी मुंबई, कांजुरमार्ग ते मुंबईला जाण्यासाठी होईल. त्यामुळे या मेट्रोचे महत्व वाढलेले आहे, असेही खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

ही विस्तारित मेट्रो लाईन कल्याण-मानपाडा-काटई नाका-कल्याण फाटामार्गे विद्यमान मेट्रो लाईन-12 शी खुतारी गावाजवळ एकत्रित होऊन तळोजा रेल्वे स्थानक अर्थात अमनदूतपर्यंत पोहोचेल.

काटई नाका ते कल्याण फाटा दरम्यान मेट्रो १४ (कांजुरमार्ग ते बदलापूर ) बरोबर कॉमन ट्रॅक व स्टेशन शेअरिंग प्रस्तावित आहे. निळजे डेपो कनेक्शन, मेट्रो १४ इंटिग्रेशन आणि नॅशनल हायस्पीड रेल्वेच्या ठाणे–बुलेट ट्रेन स्थानकाशी या मेट्रो मार्गाने जोडणी केली जाणार आहे. या सुधारित मार्गिकेची एकूण लांबी १८.४ किलोमीटर आहे. त्यातील सध्या सुमारे १०.५ किलोमीटरवर बांधकाम प्रगतीपथावर आहे.

मेट्रो १२ अ ची स्थानके
या मार्गात एकूण १२ उन्नत (एलिव्हेटेड) स्थानके प्रस्तावित आहे. प्रमुख स्थानके: मानपाडा, काटई नाका, कल्याण ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडलेगाव, कल्याण फाटा, गोठेघर, दहिसार मोरी, दहिसारगाव, किरावली गाव, रोहिंजण, खुतारी गाव