अनधिकृत ३७ शाळांविरोधात गुन्हे दाखल
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत शाळांचा आकडा ८१वरून ५८वर आला असला तरी नोटीसा, दंड आणि गुन्हे दाखल करणे अशा कारवाया करूनही या शाळांचा पाढा सुरूच असल्याचे दिसून आले आहे. ठाणे महापालिकेने ३७ अनधिकृत शाळा चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. अशा शाळांवर ठोस कारवाई होत नसल्याने या शाळांमधील विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालणाऱ्या अनधिकृत शाळांविरोधात ठाणे महानगरपालिकेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार शासकीय मान्यता नसतानाही शाळा चालवणाऱ्या ३७ संस्थांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, अशा शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहना पालिका प्रशासनाने पालकांना केले आहे.
ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने केलेल्या पडताळणीत शहरात अद्याप ५८ अनधिकृत शाळा कार्यरत असल्याचे समोर आले आहे. या शाळांपैकी बहुतांश शाळा इंग्रजी माध्यमाच्या असून काही शाळा विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांशी संलग्न असल्याचा दावा करून विद्यार्थ्यांना प्रवेश देत असल्याचे आढळले आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांच्याकडे आवश्यक मान्यता नसल्याची बाब तपासात उघड झाली. दिवा परिसरात अनधिकृत शाळांचे जाळे सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. या भागातच बहुसंख्य शाळा कार्यरत असून त्यामुळे शिक्षण विभागाने या परिसरावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याशिवाय कळवा, मानपाडा, माजिवडा, उथळसर, मुंब्रा आणि वर्तकनगर परिसरातही अशा शाळांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी शहरात ८१ अनधिकृत शाळा असल्याचे समोर आले होते. सातत्याने करण्यात आलेल्या तपासणी, नोटिसा आणि कारवाईमुळे ही संख्या यंदा ५८पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या मोहिमेला काही प्रमाणात यश मिळाले असले तरी समस्या अद्याप पूर्णपणे संपलेली नसल्याचे चित्र आहे. अनधिकृत शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महापालिकेने पर्यायी व्यवस्था सुरू केली आहे. संबंधित विद्यार्थ्यांना जवळच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत असून पालकांनाही यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत शिक्षण विभागाच्या उपायुक्त डॉ. मिताली संचेती यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या कि अनधिकृतपणे शाळा काढून विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या ५७पैकी ३७ शाळा संचालकांच्या विरोधात रीतसर विविध पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.
एका शाळेला दोन लाखांचा दंड देखील करण्यात आला आहे. ठाणे महापालिका एकमेव महापालिका आहे जिने अनधिकृत शाळा संचालकांच्या विरोधात कायदेशीर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे , असा दावा संचेती यांनी केला आहे.