मास्टीक नाही, खड्डे कसे बुजवायचे? अधिकारी-ठेकेदारांना पडला प्रश्न!

आधीच हौस, त्यात पडला पाऊस

ठाणे : निकृष्ट दर्जामुळे रस्त्यात पुन्हा खड्डे पडले, पावसाळ्यात रस्त्यांची चाळण झाली. आयुक्तांच्या आदेशानंतरही खड्डे अनेक दिवस ठाण मांडून आहेत. आता मास्टिक मिळत नसल्याची तक्रार ठेकेदारांकडून होत असून खड्डे बुजवायचे कसे, असा प्रश्न अधिकारी आणि ठेकेदारांपुढे उभा राहिला आहे.

ठाण्यातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून आपापल्या परिक्षेत्रातील खड्डे बुजवण्यासाठी इतर प्राधिकारणांकडूनही मास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. परिणामी खड्डे बुजवण्यासाठी मास्टिक मिळेनासे झाले आहे. त्यामुळे खड्डे बुजवायचे कसे? असा मोठा प्रश्न ठेकेदार आणि अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

पावसाळा सुरु झाला आणि महापालिका हद्दीत खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे. असे असताना रस्त्यांवर खड्डे पडले नसल्याचा दावा पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. घोडबंदर भागातील अंतर्गत रस्ते, तुर्फेपाडा येथील रस्ता, ढोकाळी एअरफोर्स येथील रस्ता, वागळे इस्टेट, खारीगांव, तीन हात नाका, कॅसलमील, गोकुळ नगर येथील उड्डाणपुल किंवा शहरातील इतर भागातही खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे. तसेच एमएमआरडीए, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी प्राधिकरणांच्या रस्त्यांवर देखील खड्डे पडू लागले आहेत. घोडबंदर मार्ग तर खड्ड्यातच गेल्याचे चित्र आहे. दुसरीकडे कॅडबरी, नितीन, वाघबीळ आदी उड्डाणपुलांसह, मुंबई नाशिक मार्गावर देखील खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्यातही पाऊस उघडीप देत नसल्याने खड्डे बुजविण्याच्या कामात अडचणी येत असल्याचे दिसत आहे.

खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्स, पेव्हर ब्लॉकपेक्षाही मास्टीक हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ठाणे महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, एमएसआरडीसी आदी प्राधिकरणांनी मास्टीकचा वापर करण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे रस्त्यांची उंची वर खाली होत असली तरी देखील हा पर्याय योग्य ठरत असल्याचे दिसत आहे. परंतु यामुळे ठाणे महापालिकेलाच आता मास्टीक उपलब्ध होणे कठीण होत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यातही घोडबंदर मार्गावरच मास्टीक अधिक प्रमाणात गेल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. त्यामुळे महापालिका हद्दीत खड्डे वाढण्यास सुरवात झाली तर त्यावेळेस ऐनवेळी धावपळ नको म्हणूनच आधीच मास्टीक अधिक प्रमाणात उपलब्ध करुन घ्यावे असे निर्देश महापालिका आयुक्तांनी संबंधीत विभागाला दिले आहेत. त्यामुळे महापालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग कामाला लागला आहे.

दरम्यान सध्या दिसत असलेले खड्डे हे अनेक दिवसांपासून पडलेले असून नागरीकांच्या तक्रारी आणि आयुक्तांच्या आदेशानंतरही ते वेळीच बुजवण्यात दिरंगाई केल्याने आज ही बिकट परिस्थिती ओढवल्याचे ठाणेकरांचे म्हणणे आहे.