ठाणे-बेलापूर मार्गावर अवजड वाहनांना नो एंट्री

नवी मुंबई: ठाणे-बेलापूर मार्गावरील तुर्भे रेल्वे स्थानक समोरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नवी मुंबई महानगर पालिकेने उड्डाण पुलाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे पुढील दीड महिना ठाणे-बेलापूर मार्गावर जड-अवजड वाहनांना वाहतूक विभागाने नो एन्ट्री केली आहे.

वाहतूक विभागाने वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग सूचित केले आहेत. हा बदल ६ डिसेंबर २०२३ ते २५ जानेवारी २०२४ या कालावधीपर्यंत राहणार आहे. तुर्भे रेल्वेस्थानक आणि समोरील तुर्भे स्टोअर वसाहतीमुळे ठाणे-बेलापूर मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. शिवाय याठिकाणी रस्ता ओलांडताना अनेक अपघात घडून अनेकांच्या जीवावर बेतले आहे.त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल बांधावे अशी मागणी येथील लोक प्रतिनिधींनी लावून धरली होती. ही बाब लक्षात घेऊन मनपा स्थापत्य विभागाने तुर्भे स्टोअर येथे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ३० कोटी खर्च येणार आहे. या कामाचा ठेका महावीर कन्स्ट्रक्शन या कंपनीला मागील वर्षी एप्रिल महिन्यात देण्यात आला होता. मात्र त्या कार्यादेशाचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा देण्यात आला आहे. या कामाच्या दिरंगाईस वाहतूक विभागाच्या ना हरकतीची सबब अधिकारी देत होते, मात्र आता वाहतूक विभागाने वाहतूक बदलासाठी ना हरकत दिली आहे. त्यामुळे ६ डिसेंबरपासून उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू केले जाणार आहे. हे बांधकाम पूर्ण होईपर्यंत ठाणे-बेलापूर मार्गावरील पावणे गाव येथील अग्निशमन जंक्शन ते बेलापूरकडे जाणाऱ्या मार्गावर ६ डिसेंबर २०२३ ते२५ जानेवारी २०२४ अशी दीड महिना जड अवजड वाहनांना बंदी केली आहे.

या काळात अवजड वाहनांना व्हाईट हाऊस पावणे अग्निशमन जंक्शनपासून डावीकडे वळण घेत एमआयडीसीमार्गे इच्छितस्थळी जाता येणार आहे. त्याचप्रमाणे तुर्भे नाक्याहून इंदिरानगर सर्कल येथून अमाईन्स कंपनीकडे जाणारी वाहतूकसुद्धा या काळात बंद राहणार आहे. त्यासाठी या मार्गाने जाणाऱ्या वाहनांना इंदिरानगर सर्कल येथून डावीकडे वळण घेऊन इच्छितस्थळी जाता येणार आहे. तुर्भे नाक्याहून हनुमाननगर टी पॉइंट येथून उजवीकडे वळसा घेऊन जाणाऱ्या वाहनांना या कालावधीत प्रतिबंध घातला आहे. त्याऐवजी डावीकडे वळण घेऊन इच्छितस्थळी जाता येणार आहे, तसेच उरणफाटा ब्रिजखालून एमआयडीसीमार्गे जाणाऱ्या वाहनांना बंदी असणार आहे. त्यासाठी उपलब्ध केलेल्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतून नियंत्रण विभागाने केले आहे.