ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात एकीकडे कोरोना आणि इन्फ्लुएंझाचे रुग्ण वाढत असताना आता कोरोनाचाच उपप्रकार असलेल्या ‘एक्सबीबी.१.१६’ चे नऊ रुग्ण ठाण्यात अढळल्याने ठाण्याची चिंता वाढली आहे.
दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी ठाण्यात पॉसिटीव्हिटी रेट अद्याप ०.५ टक्क्यांपेक्षा कमी असला तरी काही रुग्णांमध्ये कोरोनाची आणि एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा दोन्ही आजाराची लक्षणे आढळत असल्याने आणि आता ‘एक्सबीबी.१.१६’ या उपप्रकाराचेही रुग्ण आढळल्याने पालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा ताण अधिक वाढला आहे.
ठाणे शहरात कोरोना आणि ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराच्या रुग्ण संख्येत वाढ होण्याबरोबरच आतापर्यंत तीन जणांचा मृत्यु झालेला असतानाच, शहरात कोरोनाचा नवा उपप्रकार ‘एक्सबीबी.१.१६’ चे नऊ रुग्ण आढळून आल्याची बाब जनुकिय क्रमनिर्धारण चाचणी अहवालातून पुढे आली आहे.मात्र हे नऊ रुग्ण पूर्णपणे बरे असून काहींना घरी देखील सोडण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.
दुसरीकडे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी,कोरोना बाधित असलेले ९५ टक्के रुग्ण हे घरीच उपचार घेऊन बरे होत आहे. याशिवाय पॉसिटीव्हिटी रेटही ०.५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे. मात्र कोरोना सोबतच इन्फ्लुएंझाचे रुग्ण देखील आढळून येत असल्याने हे ठाणे महापालिकेसाठी मोठे आव्हान असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. जसे रुग्ण वाढतील तसे चाचण्या वाढवण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले आहे.याशिवाय काही रुग्णांमध्ये दोन्ही रोगांची लक्षणे आढळत असल्याने लक्षणे आढळण्यास अंगावर न काढता उपचार घेण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
एखाद्या रुग्णाला लक्षणे अढळल्यास जवळच्या खाजगी डॉक्टरकडे जात असल्याने या डॉक्टरांकडून देखील माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचे आयुक्तांनी सांगितले. कोरोना आणि इन्फ्लुएंझाशी लढण्यासाठी पालिका यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून बेडची संख्या देखील कमी पडू दिली जाणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.