५२ गुंतवणूकदारांची नऊ कोटींची फसवणूक

ठाण्यात बोगस कंपन्या स्थापून मोठ्या व्याजाचे आमिष

ठाणे : चितळसर मानपाडा येथील खेवरा सर्कलजवळील अल्पेनिया येथे राहणा-या चारजणांनी संगनमत करुन 52 गुंतवणूकदारांची तब्बल नऊ कोटी 19 लाख 30 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे प्रकरण ठाणे शहर पोलिसांनी उघडकीस आणले आहे.

गुंतवणूकदारांना दरमहा चांगल्या रकमेचे व्याज देऊन, त्यांना आकर्षित करण्याची या चौघांची ‘मोडस् ऑपरेंडी ’ होती. या चौकडीत दोन महिलांचाही सहभाग आहे. गेली सात वर्षे त्यांचा हा ‘व्याज धंदा’ बेमालुमपणे सुरु होता.

15 जानेवारी 2015 ते 9 सप्टेंबर 22 पर्यंत प्रिक्षा एंटरप्रायजेस आणि प्रिक्षा ज्वेलरी डिझाईनर या कंपन्या स्थापन करण्यात आल्या. संध्या जैसवाल, प्रफुल जैसवाल, सचिन कैमल, आणि पद्मिनी कैमल या चार मालकांनी गुंतवणुकदारांना गुंतवणूक रकमेवर दरमहा पाच टक्क्यांचे आमिष दाखवले.

याप्रकरणी फिर्यादी विजयकुमार परशुराम गोसावी यांनी पुढाकार घेऊन कळवा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यामुळे हे गुंतागुतींचे प्रकरण ठाणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेकडे देण्यात आले. आर्थिक गुन्हा शाखेने हे प्रकरण तडीस नेले आहे.

फिर्यादी गोसावी यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळवा पोलीस ठाणे येथे विविध अधिनियमानुसार 9 सप्टेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी संध्या जैसवाल (38) गृहिणी), प्रफुल जयस्वाल (38), सचिन कैमल (34) हे सर्व चितळसर मानपाडा खेवरा सर्कलजवळ राहतात. त्यांना 17 जानेवारी 2023 रोजी अटक केली आहे.

अशाच प्रकारे फसवणूक झालेल्या फसवणुकदारांनी ठाणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आणि तपास अधिकारी प्रवीण महाजन यांना संपर्क साधावा. या गुन्ह्याचा पुढील तपास अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त राजेंद्र दाभाडे, सहाय्यक आयुक्त उत्तम कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत काटकर (आर्थिक गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास श्री. महाजन करत आहेत.