विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी एनसीसीची नाराजी, गुन्हा दाखल

महाविद्यालयासमोर सर्व राजकीय पक्षांचे आंदोलन

ठाणे: ठाणे कॉलेजमध्ये एनसीसीच्या वरीष्ठ कॅडेटने विद्यार्थ्यांना केलेल्या अमानुष मारहाणप्रकरणी एनसीसीने नाराजी व्यक्त करत हा आमच्या प्रशिक्षणाचा भाग नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान आज महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सर्व राजकीय पक्षांनी जोरदार आंदोलन करत कारवाईची मागणी केली. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणात ठाणे महाविद्यालयाच्या एनसीसीने निवेदन जारी केले आहे. एनसीसीने याबाबत म्हटलं आहे की, नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एनसीसी ट्रेनिंगदरम्यान विद्यार्थ्यांवर अमानुष कारवाई करण्यात आली आहे. ही कृती अत्यंत निंदनीय आहे. हा कोणत्याही एनसीसी प्रशिक्षणाचा भाग नाही. संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार या विद्यार्थ्याला महाविद्यालयाने निलंबित केले आहे. गुन्हेगार कॅडेट किंवा माजी कॅडेटच्या या कृतीमुळे एनसीसी व्यथित झाली आहे. एनसीसीमध्ये आम्ही आमच्या कॅडेट्समध्ये सामाजिक मूल्ये आणि लष्करी नैतिकता बिंबवतो, परंतु, या कृतीला त्यात काहीही स्थान नाही.

आज ठाण्यात सर्व राजकीय पक्षांनी महाविद्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. यात राष्ट्रवादी, शिवसेना, ठाकरे गट, कॉंग्रेस आणि मनसे आघाडीवर असल्याचे दिसून आले. सकाळपासून एका मागोमाग एक आंदोलन झाले. त्यानंतर संबंधितांवर कारवाई करावी, गुन्हा दाखल करावा अशी मागणीही करण्यात आली. दिवसभर राजकीय पक्षांकडून आंदोलन सुरु असल्याने त्या महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराला छावणीचे स्वरूप आले होते.

शुक्रवारी सकाळी सर्वात आधी अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विरु वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन झाले. त्यानंतर शिवसेना (शिंदे गट) युवासेना ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे यांनी या घटनेचा निषेध नोंदवत, महाविद्यालय प्रशासनाने त्याच्या विरोधात एफआरआय नोंदवावा, तसेच कॉलेजच्या गेटला टाळे लावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न ठाणे नगर पोलिसांनी हाणून पाडला. याप्रसंगी माजी नगरसेविका नम्रता भोसले-जाधव यांच्या आदी उपस्थित होते. त्यानंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने कॉलेजकडे धाव घेत आंदोलन केले. त्यानंतर मनसेने देखील महाविद्यालयावर धडक देत आंदोलन केले. यावेळी मनसेचे शहर प्रमुख रवींद्र मोरे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे शहर कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी एन.एस.यु.आय या विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत, कॉलेजच्या प्राचार्य सुचित्रा नाईक यांना पत्राद्वारे संबंधितावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी केली. एकामागून एक होणाऱ्या या आंदोलनामुळे महाविद्यालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.

या घटनेची अद्याप कोणीही तक्रार केली नसल्याने पोलिसांनी स्वतःहून अदखलपात्र गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी दिली. तक्रार आल्यानंतर चौकशी करून याबाबत आणखी गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.