अंबरनाथ: अंबरनाथच्या नाट्यमंदिराचे लोकार्पण रविवार १९ ऑक्टोबर रोजी राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याने आणि पुढाकाराने उभारण्यात आलेल्या नाट्य मंदिराच्या उदघाटन समारंभाला भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार डॉ. बालाजी किणीकर तसेच मराठी कलाविश्वातील नामवंत दिग्दर्शक, अभिनेते आणि संगीतकार उपस्थित राहणार आहेत.
नाट्य मंदिराला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात येणार असून तशा आशयाचे बॅनर शिवसेनेच्या वतीने शहरात मोक्याच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत.
अंबरनाथ पश्चिमेतील सर्कस मैदान येथे उभारण्यात आलेल्या या नाट्यमंदिराच्या लोकार्पणानिमित्त पुढील आठ दिवस सुप्रसिद्ध नाटकांच्या विशेष प्रयोगांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तर नाट्यगृहाच्या लोकार्पणाच्या दिवशी ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांच्या सही रे सही या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक महेश कोठारे, महेश मांजरेकर, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, अभिनेते विजय गोखले, अभिनेत्री अलका कुबल, अभिनेते व दिग्दर्शक विजय पाटकर, अभिनेते मकरंद अनासपुरे आदी उपस्थित राहणार आहेत. सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार आणि संतोष जुवेकर यांसारखे दिग्गज कलाकारही उपस्थित रहाणार आहेत.