ठाण्यात नोव्हेंबरमध्ये आठ कोटींचा अंमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त

ठाणे : ठाणे शहरात नोव्हेंबर महिन्यात एकूण आठ कोटी 24 लाख 49,670 रुपये किमतीचा अमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तरुण पिढीमध्ये वाढत्या अंमली पदार्थांच्या वापरावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर (N-CORD) समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या 18 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार विविध विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी आज निवासी जिल्हाधिकारी डॉ. संदिप माने यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

नोव्हेंबरमध्ये मीरा-भाईंदरमध्ये 29 लाख 17,780, नवी मुंबईत एक कोटी 51 लाख 50,600 किमतीच्या अंमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये कोकेन, गांजा, चरस, एमडीए पावडर, मोफोड्रॉन, कफ सीरफ बॉटल्स, नशेच्या गोळया अशा अंमली पदार्थांचा समावेश आहे.

ठाणे पोलीस दलाकडून नोव्हेंबर 2025 मध्ये ठाणे शहर, मीरा-भाईंदर, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई या भागातील विविध ठिकाणी असलेले 48 गोडाऊन, 52 कंपन्या, 20 व्यसनमुक्ती केंद्रे, 83 फार्म हाऊस, 70 रासायनिक कारखाने, 112 बंद पडलेल्या कंपन्यांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत.

परिसरात निदर्शनात येत असलेल्या अंमली पदार्थांच्या गैरव्यवहाराबद्दल नागरिकांनी 1933 या हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने यांनी केली आहे.