नाना साठे प्रतिष्ठानने केली सैनिकांची दिवाळी गोड

ठाणे : नाना साठे प्रतिष्ठानच्या वतीने सैनिकांची दिवाळी संस्मरणीय करण्यासाठी फराळ बॉक्स पाठवण्याचे ठरवले. प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला लोकांनी उदंड प्रतिसाद दिला असून या उपक्रमांतर्गत दिवाळी फराळाचे बॉक्सेस सैनिकी तळांवर पोहोचले आहेत.

कोणताही महत्त्वाकांक्षी उपक्रम हा अनेकांचे मदतीचे हात लागल्यावरच पूर्ण होतो यावर आमचा विश्वास आहे. केणी मॅडमच्या मदतीने व मार्गदर्शनाने आम्हाला सैनिकांपर्यंत फराळ पोहोचवण्याचा मार्ग मिळाला आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून पहिल्याच वर्षी तब्बल १२५० सैनिकांपर्यंत फराळ पोहोचवण्यात यश आले. या फराळाच्या निर्मितीचे आव्हान लाडूंसाठी सुप्रसिद्ध असणारे कानिटकर व घाणेकर यांनी निभावले. फराळ बॉक्सच्या या उपक्रमासाठी बॉक्ससाठी देणग्या मिळाल्याच, त्या पलिकडेही अनेकांनी विविध प्रकारची मदत केली. थेट पॅकिंगच्या अभियानातही अनेकजण सहभागी झाले. आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती लोकांच्या मनात किती आत्मीयता असते व त्यांच्या त्यागाची किती जाण असते याचाच अनुभव या उपक्रमादरम्यान आला. प्रतिष्ठानच्या फराळ बॉक्स उपक्रमात ज्यांचे योगदान होते त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येत असून या फराळ बॉक्स उपक्रमाच्या माध्यमातून ‘शूरां आम्हीं वंदिले’ हीच भावना प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या मनात आहे.