एमएमआरडीएच्या इमारतीत नमाज पठण? मनसेचा दणका

ठाणे: घोडबंदर रोडवरील चितळसर मानपाडा परिसरात असलेल्या एमएमआरडीएच्या काही इमारती आहेत. विस्थापितांना आसरा मिळावा यासाठी एमएमआरडीएने उभारलेल्या इमारतीमध्ये स्पीकर लावून चक्क नमाज पडली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने ठाण्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी स्पीकर आणि इतर साहित्य ताब्यात घेतले आहे.

ठाणे महानगरपालिका हद्दीतील प्रकल्प विस्थापित बधिताना कुटुंबांना घोडबंदर येथील एमएमआरडीएच्या इमारतीत घरं दिली जातात. सद्या काही इमारती रिकाम्या असून एका इमारतीतून चक्क अजानचे आवाज सुरु झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. दिवसातून तब्बल तीन वेळा स्पीकरवरून अजान दिली जात होती. तिथे अनेकांचे येणे जाणे असल्याचे निदर्शनास येताच काही स्थानिकांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना कळवले. ते पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी चौकशी करून तिथे लावलेला स्पीकर ताब्यात घेतला.

मुंब्र्यातून आलेल्या काही विस्थापित कुटुंबांनी हा प्रकार सुरु केल्याची बाब पोलीस तपासात समोर आली. मशीदींवर लावलेल्या भोंग्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असताना देखील असे प्रकार घडतात त्यामुळे पोलिसांनी या विरोधात कडक कारवाई करावी अन्यथा पुढच्या वेळी मनसे स्टाईलने दणका देऊ असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला.