ऐरोली, बेलापूरमधून नाईक पिता-पुत्रासह दिग्गजांचे अर्ज दाखल

नवी मुंबई : बेलापूरमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून संदीप नाईक, मनसेतर्फे गजानन काळे तर ऐरोलीमधून भाजपतर्फे गणेश नाईक, महाविकास आघाडीतर्फे एम.के. मढवी, मनसेतर्फे निलेश बाणखीले यांनी अर्ज दाखल केले.

ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी सोमवार 28 ऑक्टोबर रोजी शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले.

बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार संदीप नाईक यांना तिकीट नाकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. बेलापूरमधून संदीप नाईक यांनी आपला अर्ज दाखल केला तर माजी मंत्री आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी भाजपामधून आपला अर्ज दाखल केला. नवी मुंबईच्या आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात प्रथमच नाईक परिवारातील सदस्यांनी सत्ताधारी आणि विरोध पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

उद्या मंगळवारी बेलापूरमधून भाजपच्या अधिकृत उमेदवार आमदार मंदा म्हात्रे तर ऐरोलीतून महायुतीत बंडखोरी केलेले विजय चौगुले अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत.