४८० कोटींचा उड्डाणपुलाचा आराखडा तयार
उभारणीसाठी एमएमआरडीएला घालणार गळ
ठाणे : मुंब्रा येथून थेट दिव्याला जाण्यासाठी ४८० कोटी खर्च करून उड्डाणपूल बांधण्याची ठाणे महापालिकेची योजना असून महापालिका प्रशासनाने त्याला मंजुरी दिली आहे. या पुलामुळे मुंब्रा येथून दिव्याला जाण्यासाठी लागणारा अर्धा तासाचा वेळ दहा मिनिटांवर येणार आहे.
दिवा येथील नागरिकांना मुंब्रा आणि ठाण्याला जाण्यासाठी कल्याण फाटा किंवा खिडकाळी येथून जावे लागते, त्यासाठी किमान अर्धा तास लागतो. तसेच वाहतूक कोंडीचा देखील सामना करावा लागतो. कल्याण फाटा येथून खर्डी-शीळ या रस्त्याने दिवा येथे जावे लागते, त्यामुळे दिवेकरांचा वेळ आणि इंधन मोठ्या प्रमाणावर खर्च होतो.
या भागातील लोकप्रतिनिधींनी रेल्वेला समांतर रस्ता तयार करण्याची मागणी केली होती. त्या मागणीचा विचार करून ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पर्यायी रस्त्याची चाचपणी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंब्रा अग्निशमन केंद्र चुहा ब्रिजमार्गे शीळ-दिवा रस्त्याला जोडणारा २.२ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल तयार करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
हा उड्डाणपूल मुंब्रा अग्निशमन केंद येथे सुरू होऊन दिवा-शीळ रस्ता येथे उतरणार आहे. तेथून अवघ्या एक किमी अंतरावर दिवा रेल्वे स्टेशन आहे. हा पूल तयार झाल्यानंतर दिवेकरांना अवघ्या १० मिनिटात मुंब्रा येथे जाणे शक्य होईल.
या उड्डाण पुलाला ४८० कोटी रुपये इतका खर्च येणार आहे, तो करण्याची क्षमता ठामपामध्ये नाही, त्यामुळे हा सर्व खर्च मुंबई महानगर प्रादेशिक प्राधिकरणाने करावा, अशी विनंती केली जाणार असल्याचे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘ठाणेवैभव’ला सांगितले. हा पूल झाल्यानंतर बुलेट ट्रेनच्या स्टेशनला जाणे देखील सोपे होणार आहे. मोठगाव-माणकोली मार्गाला देखील हा मार्ग भविष्यात जोडला जाऊ शकतो, अशी माहिती त्यांनी दिली.
दिवा येथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणावर वाढून या भागातील दळणवळण सोयी-सुविधा दिवेकरांना मिळतील असेही तो अधिकारी म्हणाला.