मुंबई-नवी मुंबई प्रवास होणार तणावमुक्त

अटल सेतूवर टोलवर ५० टक्के सूट

मुंबई: मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूच्या वापरासाठी आकारल्या जाणाऱ्या पथकरात ( टोल) ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय पुढे आणखी एक वर्ष कायम ठेवण्यास शनिवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. याशिवाय इलेक्ट्रिकल मोटार कार, बस यांनाही अटल सेतूच्या पथकरातून पूर्ण सूट देण्याचा समावेश अधिसूचनेत करण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे ई- व्हेईकल्सधारक तसेच अन्य वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाने ४ जानेवारी २०२४ रोजीच्या बैठकीत अटल सेतूच्या वापरासाठी ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाप्रमाणेच पुढे १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पथकर आकारण्यास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर इतर वाहनांसाठी एकेरी प्रवासाचा पथकर दरही निश्चित करण्यात आले आहेत.

एकेरी प्रवासावर आकाराला जाणार टोल
मोटर, जीप, व्हॅन, हलके मोटार वाहन-२५० रु., २०० रु. आणि ५० रु., हलके व्यावसायिक वाहन, हलके मालवाहू वाहन, मिनी बस-४०० रु.,३२० रु., ८० रु., ट्रक अथवा बस ( दोन आसांचे)-८३० रु., ६५५ रु., १७० रु., तीन आसांचे व्यावसायिक वाहन-९०५ रु. ७१५ रु. १८५ रु.
अवजड बांधकाम यंत्रसामग्री, जमीन खोदाई यंत्रसामग्री, अधिक आसांचे वाहन-१३०० रु., १०३० रु., २७० रु., अति अवजड वाहन, सात अथवा त्यापेक्षा अधिक आसांचे वाहन-१५०० रु.१२५५रु.आणि ३२५ रु.